व्हीप झुगारला ; यावलच्या नगरसेवकांना म्हणणे मांडण्यासाठी मुदत

0
यावल:- नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडीप्रसंगी शविआचे नगरसेवक सुधाकर आनंउस धनगर व महर्षी व्यास शविआच्या रेखा युवराज चौधरी या दोघांनी गटप्रमुखांचे व्हीप झुगारल्याने  जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल अपात्र याचिकेसंदर्भात नगरसेवक धनगर व नगरसेविका चौधरी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. उपरोक्त नगरसेवकांनी आपले म्हणणे  सादर करण्यासाठी मुदत मागितल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी 11 जून ही तारीख दिली आहे.
असे आहे व्हीप झुगारणे प्रकरण
15 जानेवारी रोजी येथील नगरपालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापती पदाची निवड होती. शहर विकास आघाडीचे गटप्रमुख अतुल पाटील यांनी गटाचे नगरसेवक सुधाकर धनगर यांना महर्षी व्यासच्या नगरसेविका देवयानी गीरीष महाजन पाणीपुरवठा सभापतीसाठी सहकार्य करण्याबाबत धनगर यांना व्हीप बजावला होता मात्र धनगर यांनी स्वत: सभापती पदाची  उमेदवारी  दाखल करून गटप्रमुखाचा व्हीप झुगारला होता तर महर्षी व्यास, शविआचे गटप्रमुख राकेश कोलते यांनी शविआच्या रुख्मीनी भालेराव यांच्या बाल कल्याण सभापती पदासाठी  सहकार्य करण्याबाबत गटाच्या नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना व्हीप बजावला असता चौधरी यांनी कोलते यांचा व्हिप झुगारत काँग्रेसच्या उमेदवारास अनुमोदन दिल्याने दोन्ही गटप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेे आपापल्या गटाकडून  सुधाकर धनगर व रेखा चौधरी यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव    सादर केला होता. प्रस्तावावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नगरसेवक धनगर व नगरसेविका चौधरी यांना सोमवारी उपस्थित राहण्याचे आदेश  दिले होते. त्यानुसार दोन्ही नगरसेवकांनी हजेरी लावत नगरसेवक धनगर व नगरसेविका चौधरी यांनी नियुक्त वकीलामार्फत म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली असता जिल्हाधिकार्‍यांनी 11 जून ही तारीख दिली आहे.