पुणे जिल्हयात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात
225 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांकडून गुलाबाची होते शेती
तळेगाव दाभाडे : व्हॅलेंटाईन डे आणि गुलाबाचे फुल यांचे जवळचे नाते आहे. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आल्यामुळे मावळ तालुक्यात गुलाब फुल उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे. या गुलाब फुलांची लागवड, त्याची निगा, आणि त्यांची विक्री यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप टाकला आहे. पुणे जिल्हयात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होते. तालुक्यात 250 हेक्टर क्षेत्रावर पॉलीहाऊस शेती आहे यात 225 हेक्टर क्षेत्रावर गुलाब पिकवला जातो. तर शिल्लक 25 हेक्टर क्षेत्रावर जरबेरा कारनेशन व इतर भाजीपाला अशी पिके घेतली जातात. देशासह परदेशातही मोठया प्रमाणात या फुलांची निर्यात केली जाते. व्हॅलेंटाईन डेच्या काळात या फुलांना मोठया प्रमाणात मागणी असते. जपान, इंग्लड, फ्रान्स, हॅालंड, ऑस्टेलिया, दुबई या देशात या फुलांना बरीच मागणी असते.
हे देखील वाचा
विविध औषधांची फवारणी
25 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या काळात गुलाब फुलांची परदेशात निर्यात केली जाते. प्रति 40 सेंटीमीटर फुलास 9 रुपये, 50 सेंटीमीटर फुलास 12 रूपये, 60 सेंटीमीटर फुलास 13 रुपये तर 70 सेंटीमीटर फुलास 14 रूपये पर्यत भाव मिळतो. ही निर्यातक्षम फुले उत्पादनासाठी शेतकरी दोन महिने अगोदरच तयारी सुरू करत असतो. 1 ते 10 डिसेंबरच्या कालावधीमध्ये झाडांची कटींग व बेंडीग केली जाते. त्यांना चांगल्या प्रतीची खते दिली जातात कुठल्याई प्रकारच्या रोगराईला बळी पडू नये म्हणून विविध औषधांची फवारणी केली जाते. त्यांची प्रत व दर्जा चांगला ठेवला जातो. यासाठी अधिक कामगार कामासाठी लावले जातात. 28 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात फुले विक्रीसाठी तयार केली जातात. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. व्हॅलेंटाईनडे साठी लाल फुलांनाच जास्त मागणी असते. या काळात प्रती एकरी 40 हजार निर्यातक्षम फुलांचे उत्पादन घेतले जाते. निर्यातक्षम फुलांची सकाळी 7 ते 9 या वेळेत कटिंग ( हारवेस्टींग) केली जाते. त्या फुलांच्या दांडीचे डेलिफिंग मशीनच्या साहाय्याने काही पाने काढली जातात. नंतर ही फुले शीतगृहामध्ये ठेऊन नंतर ती सेंटीमीटर नुसार निवडली जातात. त्यामधून पुन्हा – ग्रेड इग्रेड उ ग्रेड नुसार निवडली जातात. मागणी नुसार 10 व 12 फुलांचे बंच तयार केले जातात या काळात फुल खराब होऊ नये म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. त्यानंतर ती परदेशी बाजारात पाठवली जातात.
फुलांची निर्यात वाढली
यंदा टॉपसिक्रेट या लाल रंगाच्या गुलाबाला मोठी मागणी आहे. सोलीयर (पिवळा), आवलांच (पांढरा), गालस्टराईक, पिवळा) ट्रॉपिकल (वारंगी) या फुलांच्या मागणी असते. मावळ तालुक्यात फुलांची निर्यात वाढली आहे. फुलांचा तुटवडा असल्यामुळे स्थानिक बाजारात सुद्धा फुलांचे दर वाढलेले दिसून येतात. गुलाब फुलांचे उत्पादक पंडित शिकारे यांनी सांगितले की, गुलाब फुलांची प्रत चांगली सांभाळली तर चांगला दर मिळतो. परदेशातुन विक्रेते फुलाची प्रत तपासणीसाठी येतात. प्रत चांगली असली तर फुलांचे बुकिंग करतात या साठी शेतकरी बांधवांनी दर्जेदार उत्पादन घेणे गरजेचे आहे. मुकूंद ठाकर अध्यक्ष फुल उत्पादक संघ-गेल्या दहा वर्षापासुन उत्पादनाचा चांगला दर्जा राखला या मुळे मागणी वाढत आहे. याच सोबत दर आठवडयाला दोन वेळा परदेशात विक्रीसाठी पाठविली जातात. चांगली प्रतीची फुले उत्पादीत केल्याने परदेशी बाजारात आमच्या फुलांना मागणी वाढली आहे.