‘व्हॅलेंटाईन डे’ला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाला निवेदन

0

जळगाव । गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवापिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, यादिवशी होणार्या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे.

विशेष पोलिस पथके नियुक्त करण्याची मागणी : व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या नावाखाली होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवावी, मुलींची छेडछाड करणार्‍या युवकांवर कारवाई करावी, आज हिंदु जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, माध्यमीक आणि उच्च माध्यमीक अधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी जय भवानी गृपचे येसाजी चव्हाण, जय माता दी गृपचे यश किंगरानी, ललीत सोनवणे, राहूल कासार, राहूल तळेले, बजरंग दलाचे महानगर संयोजक राजेंद्र नन्नवरे, आकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या रागेश्री देशपांडे आदींची उपस्थित होते.