‘व्हॅलेंन्टाईन डे’चा मुहूर्तात सहा जोडप्यात विवाह नोंदणी

0

जळगाव – गुरूवारी १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर ‘व्हॅलेंन्टाईन डे’ उत्साहात साजरा होत असतांना जळगावातील विवाह नोंदणी कार्यालयात गुरूवारी एकूण सहा जोडप्यांनी विवाहाची नोंदणी केली. ‘व्हॅलेंन्टाईन डे’ चा मुहूर्त साधण्यासाठी इच्छूक जोडप्यांची चांगलीच लगीनघाई दिसून आली. दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंन्टाईन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे प्रेमी युगलांसाठी उत्सवच असतो. मात्र अलीकडे याच दिनाचा मुहूर्त साधून लग्न आटोपण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुरूवारी हाच मुहूर्त साधून जिल्हयातील एकूण सहा जोडप्यांनी विवाहची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या विवाह नोंदणी कार्यालयात आटोपून घेतली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या विवाह नोंदणी कार्यालयात दिवसभर लग्नाची नोंदणी करणार्‍या इच्छूक जोडप्यांची लगबग दिसून आली.

पालक पोहचले मुलांचा शोध घेत
व्हॅलेंन्टाईन दिनाचे औचीत्य साधून लग्न आवरण्याचा प्रकार तरूण तरूणी अलीकडे मोठया प्रमाणात करीत असल्याच्या प्रकारामुळे पालक देखील सावद झाले आहेत. यामुळे काही पालक गुरूवारी आपल्या मुलांचा शोध घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात पोहचले.

मामा भाच्याचे कृत्य पाहून झाला हतबल
जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या विवाह नोंदणी कार्यालयात गुरूवारी नोंदणी झालेल्या एका विवाहाची चौकशी करण्यासाठी मामा थेट विवाह नोंदणी कार्यालयात पोहचला मात्र त्या आधीच भाच्याने लग्नाची नोंदणी उरकल्यामुळे तो हतबल झाला. मामा आपली डॉक्टर मुलगी भाच्याला देणार होता. मात्र त्या आधीच भाच्याने लग् उरकल्याचे समजल्यानंतर त्या मामाने ही व्यथा कार्यालयातील कर्मचार्‍यांना ऐकून दाखविली.