आता विचारू नका.. व्हेंटिलेटरचे कासव म्हणजे कुठले? किमान मुंबईकराने तरी याची देही याची डोळा व्हेंटिलेटरच्या कासवाबद्दल अशी अनास्था दाखवणे रुचणारे नाही. बर्र मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा…..हे गाणे नक्कीच ऐकले असेल तुम्ही…! पण गाण्याच्या या दोन ओळी आज इथे लिहिण्याचे प्रयोजन म्हणजे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी नाही तर युतीच्या पुन्हा पुन्हा आणि पुन्हा जुळलेल्या तारा….! या जुळून आलेल्या तारांनी इतके दिवस व्हेंटिलेटरवर असणार्या कासवाला पुन्हा एकदा जीवनदान मिळाल्याचा साक्षात्कार झाला आहे.
मध्यंतरी कुठल्यातरी सोन्याच्या अंडी देणार्या कोंबडीवर (मुंबई महानगरपालिका) हक्क गाजवण्यावरून सेना-भाजपमध्ये ताणले गेलेले संबंध आता कासवगतीने पूर्वपदावर येत आहेत, असे ऐकून मुंबईकरांची तर पुरती झोप उडाली आहे. नाटकाचा पहिला अंक मजेत, दुसरा अंक भांडणात आणि तिसरा अंक पुन्हा खेळीमेळीत असे चित्र सध्या सेना-भाजपच्या रंगमंचावर रंगत आहे. त्यामुळे मोडेन पण झुकणार नाही, अशी टोकाची भूमिका घेऊन दोन्ही पक्षांनी चर्चेची दारेही एकमेकांसाठी बंद केलेली असताना अचानक हा राजमार्ग कसा काय उघडला हे त्या उद्धवांना आणि चाणाक्ष फडणवीसांनाच माहिती रे परमेश्वरा, असे डायलॉग यापुढे व्हायरल झाले तर आश्चर्य वाटायला नको.
स्थिर सरकारसाठी आणि आता देशात वर्चस्वासाठी भाजपला शिवसेनेची साथ अन् राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सेनेला सत्तेची ऊब अपरिहार्य आहे. सेनेने राजकीय अगतिकता म्हणून सत्तेत चंचूप्रवेश केला. पण, भाजपच्या तत्त्वाशी, ध्येय-धोरणाशी ते प्रामाणिक राहू शकले नाही. सत्ता लाभासाठी मंत्रालय अन् विरोधासाठी मातोश्री अशी दोन सत्ता केंद्रस्थाने ओघाओघाने निर्माण झाली. यानिमित्ताने मंत्रालयातील सरकारी निर्णयाला, ध्येयधोरणाला सुरुंग लावण्याची कारस्थाने झाली. सत्तेचा बोलवता धनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हा संभ्रम सर्वसामान्याच्या मनाला भेडसावू लागला आहे. एकाच पक्षाने समर्थक व विरोधकाची भूमिका प्रभावीपणे निभावण्याची अपवादात्मक विघातक व्यवस्था यानिमित्ताने महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मनपातील भाजपच्या घवघवीत यशामुळे शिवसेना धास्तावली असल्याच्या चर्चाही यानिमित्ताने प्रत्येकाच्या तोंडी आहेतच.मुंबईकराचा मोठा कौल भाजपला मिळाल्यानंतर आता एकहाती सत्ता गाजवण्यासाठी भाजपला सेनेच्या मताची गरज आहे, हे शिवसेना पुरती ओळखून आहे. प्रत्येक घटनेचे भांडवल करून एकमेकांचा अवमान करण्याची सेना भाजपची राजकीय खेळी सतत सुरू आहे. या अशा बेभरवशाच्या, सूड भावनेने झपाटलेल्या भिडूबरोबर राजकीय संसार मांडणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासमान आहे. सत्तामोहापायी शिवसेना स्वतःहून सत्तेबाहेर पडणार नाही तर शिवसेनेला सत्तेबाहेर घालवणे भाजपला सोसणारे, परवडणारे नाही. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता हा राजकीय सावळागोंधळ विषण्ण मनाने बघत आहे आणि या सगळ्याला पूर्णविराम देण्याची आतुरतेने वाट बघत आहे. निवडणुकांमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यानंतर त्या उत्साहवर्धक वातावरणाचा उपयोग करून आणखी एक, आणखी एक असे यश पदरात पाडून घ्यावे, ही आकांक्षा भाजपच्या धुरिणांच्या मनात निर्माण झाली, तर ती योग्य की अयोग्य याची चर्चा करता येईल. मात्र, तसे वाटणे ही बाब नैसर्गिक आहे, यात शंका नाही. माडगुळकर यांनी असेही लिहिले की, वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा त्याप्रमाणे सेना-भाजप यांचा काडीमोड झाला तो मिलनासाठीच….यात दुमत नाही. कारण तेव्हा वेगळी चूल मांडून संसार थाटणे ही काळाची गरज होती आणि आता एकत्र येणे हीसुद्धा काळाचीच हाक आहे.
निवडणुकीचा प्रचार म्हटला की प्रतिपक्षावर घणाघाती टीका होतच राहणार. या टीकेतील सर्वच मुद्दे वास्तव व तर्क यांना धरून असतात असे नाही, पण युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते. या उक्तीप्रमाणे असे होतच राहणार. पण अशा वास्तव वा अवास्तव टीका-टिपणीचा परिणाम समाजमनावर काय होतो, याचा विचारही सिव्हिल सोसायटीतल्या या राजकारण्यांनी नक्कीच करायला हवा. एवढ्या सगळ्यात शिवसेनेने लोकसभा व अर्थसंकल्पीय अधिवेशनातील घातलेल्या गोंधळानंतर त्यामुळेच भाजपला भाग पडले होते, तरीही शिवसेनेच्या तथाकथित ढाण्या वाघाची ही अचानक शेळी कशी झाली, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. फडणवीसांची धूर्त खेळी यावेळीही सेनेवर मात करून गेली, असे म्हणता येईल. एकूणच काय घटस्फोटानंतर स्वतंत्र झालेल्या पती-पत्नीने एकमेकांना दूषणे देणे शक्य तितक्या लवकर थांबवावे, हे दोघांच्याही दृष्टीने श्रेयस्कर असून, ते आता कमळाबाईना व वाघाला कळावे हीच इच्छा. व्हेंटिलेटरवरच्या कासवाचे आयुष्यमान अजून किती महिन्यांनी आणि कुठल्या निवडणुकांपर्यंत वाढले हे बाकी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सीमा महांगडे – 9920307309