चाकणमध्ये स्वाईन फ्लूने डोके वर काढले
ग्रामीण भागातील नागरिकांमधून चिंतेचे वातावरण
चाकण : पिंपरी-चिंचवड शहरानंतर आता चाकण परिसरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. गुरुवारी (दि.6) सकाळी स्वाईन फ्लू झाल्यामुळे तीस वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसांपासून संबंधित महिलेला कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उपचार करणार्या डॉक्टरांनी दिली आहे. वैद्यकीय अहवालामध्ये संबंधित महिला स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आल्याने चाकण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनिता सिंग (वय 30, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा
चाकण चक्रेश्वर रस्त्यावरील एका इमारतीतील सदनिकेत राहणारी संबंधित 30 वर्षीय महिलेला एक आठवड्यापूर्वी चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर तत्काळ अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. मात्र तिची फुफ्फुसे संपूर्णपणे निकामी झाली होती. वैद्यकीय अहवालामध्ये संबंधित महिला स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी (दि.6) सकाळी मृत्यू झाल्याचे डॉ.राजेश घाटकर यांनी सांगितले. तर संबंधित महिलेचा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.माधव कणकवले यांनी सांगितले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा जीवघेणा आजार लवकरात-लवकर आटोक्यात आणण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीचा साठा तत्काळ मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. तसेच, या आजाराबाबत स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांनी दक्षता व जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वेळीच दक्षता घ्यावी
चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधव कणकवले यांनी सांगितले की, संबंधित महिलेला खाजगी लॅबमधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्वाईन फ्लू झाल्याचे दिसून येत आहे. त्याबाबतचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून (एनआयव्ही) तपासून घेण्यात येणार आहे. इन्फ्लुएन्झा एएच 1 एन 1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू आजार होऊ शकतो. वृद्ध, लहान मुले यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना दक्षता घ्यावी. थंडी, ताप, खोकला, उलटी, मळमळ, घशात खवखव अशी सामान्य लक्षणेच असल्याने याकडे दुर्लक्ष करू नये. स्वाईन फ्लूबाबत वेळीच दक्षता घेतल्यास धोका होत नाही.