व्हॉटसअ‍ॅपवर करा ध्वनीप्रदूषणाची तक्रार

0

पुणे । गणेशोत्सवादरम्यान अनेक गणेश मंडळे लाऊड स्पिकर, डी. जे. व डॉल्बी यांचा वापर करतात. याकाळात मंडळांकडून बर्‍याचदा आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या जातात. त्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेऊन याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांनी टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पुणे ग्रामीणच्या हद्दीत राहाणार्‍या नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाबाबतची तक्रार नजीकच्या पोलिस स्टेशनला फोन, ईमेलद्वारे द्यावी. तसेच पुणे ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष येथे 100 क्रमांक व 9422405421 या व्हॉटसअप क्रमांकावर नागरिकांना तक्रार करता येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. जिल्ह्याच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांना ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार कोणाकडे द्यावी, हे माहिती व्हावे याकरीता पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 36 पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. या अधिकार्‍यांची माहिती पुणे ग्रामीण पोलिस दलाची वेबसाईट puneruralpolice.gov.in यावर अपलोड करण्यात आली आहे. तसेच ती पुण्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील 2 नगरपालिका व 11 नगरपरिषदा यांच्या वेबसाईट व वॉर्ड कार्यालयात प्रसिध्दी करीता पाठविण्यात आली आहे, असेही पुणे ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.