चाळीसगाव । आजकाल व्हॉटस् अॅपवर दररोज हजारो संदेश येतात त्यातील काही अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख, एैतिहासिक माहिती, शेतीविषयक मार्गदर्शन तर समाजाविषयी बोधनपर महत्वाचे संदेश असतात. मात्र आदींकडे दुर्लक्ष केले जाते. परंतू व्हॉट्सअप हे प्रभावी प्रसिध्दी माध्यम आजच्या काळात होत आहे. याच भावनेतून रक्तदानाविषयी प्रचार प्रसार केले जात आहे. मुराद पटेल, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी व्हॉट्सगृपच्या माध्यमातून रक्तदात्यांनी कर्तव्य आणि अधिकार लक्षात घेऊन गरजू रुग्णांना मदत करण्याकामी पुढे आले पाहिजे असा अभिनव संदेशपर अभियान सुरु केले आहे. रक्तदात्याचा रक्तगट, वजन, वय तसेच संपर्क क्रमांक यांची सुची तयार करुन व्हॉट्सअप गृपमध्ये ही माहिती देण्यात येत आहे.
रक्तपेढीत रक्तदान
स्वत:चे आयुष्य जगताना सामाजिक भान बाळगत इतरांच्या आयुष्यातही रंग भरण्याचे काम करायला हवे. अत्यावश्यक परिस्थितीसोबतच प्रत्येक औचित्यपर कार्यक्रमात रक्तदान करत या श्रेष्ठदानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला जात असतो. चाळीसगाव येथील रक्तपेढीत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता रुग्णसेवेच्या हेतूने अनेक लोक आवर्जून व ऐच्छिकपणे रक्तदान करतात.
रुग्णालयात जाऊन रक्तदान
अनेक जण रक्तदानाचा संकल्प करत आहे. छाया पाटील यांनी देखील रक्तदानाचा संकल्प केला होता परंतू हिमोग्लोबीनची मात्रा अपूर्णतेमुळे त्या रक्तदान करु शकल्या नाहीत. समकीत छाजेड, राहूल बोरसे यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रक्तदान केले. समाज ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. रक्तदानामुळे इतरांच्या जीवनात आनंद फुलणार आहे.