व्हॉटस्अ‍ॅपवर फिरणार्‍या ‘त्या’ जाहिराती बोगस

0

मुंबई । व्हॉट्सप या समाज माध्यमावर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या 10 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन विविध पदांच्या भरतीबाबत बोगस जाहीरात पुढे पाठविली जात असून अशी कोणतीही जाहिरात देण्यात आली नाही. तरी अशा बोगस जाहिरातीपासून सावध रहावे आणि आपली फसगत होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

228 पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात
विविध व्हॉट्सप ग्रुपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या नावाची गट-ड वर्गातील लिपिक-34, सहायक रोखपाल 22, रोखपाल-10, लेखापाल-6,गोपनीय लिपिक-19, देयक लेखापाल-14,शिपाई-58, वाहनचालक-34, नाईक-31 अशी 228 पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात फिरत आहे. जाहिरातीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-अपमु-2917/प्र.क्र.44/19अ, दिनांक 10 जानेवारी 2018 नमूद केलेला आहे व जाहिरातीखाली स्वाक्षरी केलेल्या अधिकार्‍याचे पदनाम ‘अध्यक्ष निवड समिती तथा उपसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई’ असे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात समाज माध्यमावर फिरणारी जाहिरात बोगस असून, सामान्य प्रशासन विभागामार्फत अशा प्रकारे पदभरतीसाठी कोणतीही जाहिरात दिलेली नाही. जाहिरातीमधील बहुतांशी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. अशी जाहिरात शासनाच्या विभागाकडून दिली जात नाही. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयाव्दारे सामान्य प्रशासन विभाग व त्या विभागांतर्गत अन्य पाच कार्यालयांच्या आस्थापनेवरील 195 अस्थायी पदांना दिनांक 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही भरतीची जाहिरात नसून नियमित प्रशासकीय बाबीसंबंधीचा शासन निर्णय आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.