पिंपरी-चिंचवड : व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या एका चुकीच्या पोस्टमुळे पिंपरी-चिंचवडमधल्या एका अंध दाम्पत्याचं जगणं मुश्किल झाले आहे. अंध दाम्पत्याविषयी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता अज्ञात व्यक्तीने ही पोस्ट फॉरवर्ड केली. मात्र, त्याचा त्रास अंध दाम्पत्याला सहन करावा लागत आहे. ‘फोटोमधील लहान मुलगी ही पिंपरीतल्या अजमेरा, मासुळकर कॉलनी येथे दिसली आहे. भिकारी म्हणतात की, ती मुलगी आमची आहे. पण हे पटण्यासारखं नाही. हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा, काय माहिती, कोणाची चिमुरडी पुन्हा त्यांना भेटेल.’ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या या चार ओळींच्या संदेशाने या अंध दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ उठले आहे.
ती मुलगी अंध दाम्पत्याचीच
धर्मेंद्र लोखंडे आणि शीतल लोखंडे असे अंध दाम्पत्याचे नाव आहे. ते दोघेही जन्माने 100 टक्के अंध आहेत. 2012 मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या दुसर्या वर्षी त्यांना एक गोंडस मुलगी झाली. पण तीच मुलगी त्यांची नसल्याचा दावा करणारी पोस्ट कुणीतरी त्यांच्या फोटोसकट व्हॉट्सअॅपवर व्हायरल केली. त्यामुळे त्यांच्यामागे लोकांचा ससेमिरा सुरू झाला. अचानक असे घडल्याने भेदरलेल्या दाम्पत्याला काहीही कळेना. दोघांवर त्यांच्याच मुलीच्या अपहरणाचा आरोप लागला होता. या दाम्पत्याची कौटुंबीक माहिती जाणून घेतल्यानंतर या दोघांचा सच्चेपणा समोर आला आहे. पोस्टमध्ये ज्या मुलीचा उल्लेख करण्यात आला आहे; ती चिमुकली अंध लोखंडे दाम्पत्याचीच आहे. मात्र, तरीही हा खोडसाळपणा करणार्या व्यक्तीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा घ्या पुरावा
सिंधुबाई निकम या अंध लोखंडे दाम्पत्याच्या शेजारी राहतात. माझ्या डोळ्यासमोर दोघांचे लग्न झाले. माझ्यासमोर त्यांना मूल झाले. मात्र, लोकांनी असे करायला नको होते. आधीच देवाने त्यांच्या आयुष्यात खूप दु:ख दिले आहे. लोकांनी त्यांना अजून दु:ख देऊ नये, असे त्या पोटतिडकीने सांगतात. ज्यांनी आयुष्यात कधीच उजेड पाहिला नाही, ते अंध लोखंडे दाम्पत्य सध्या डोळस माणसांच्या अंधविश्वासामुळे संशयाच्या अंधारात चाचपडत आहे. ती मुलगी लोखंडे दाम्पत्याचीच आहे, असे सिंधुबाईंनीदेखील सांगितले. त्यामुळे चुकीची पोस्ट फॉरवर्ड करणार्यांना अजून दुसरा पुरावा देण्याची गरज नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
सगळंच खरं नसते
व्हॉट्सअॅपवर येतं, ते सगळंच खरं असतं, असे मानने मुळात चुकीचे आहे. मात्र, आपण कोणतीही पोस्ट खातरजमा न करता सरळ पुढे फॉरवर्ड करतो. आला मेसेज की, कर फॉरवर्ड या संस्कृतीमुळे धोका वाढला आहे. तंत्रज्ञानावर ताबा कसा मिळवता येईल, हे माहिती नाही. परंतु, आपण आपल्यावर मात्र, ताबा ठेवण्याची गरज आहे, असे यानिमित्ताने सांगता येईल.