नवी दिल्ली । सध्या प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅप असल्याचे तुम्ही पाहिलं असेल. याच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक फोटोज, व्हिडिओज किंवा एखादी माहिती एका क्षणात शेकडो लोकांपर्यंत पोहोचते. मात्र, अनेकदा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चुकीची माहिती, मॉर्फ केलेले फोटोज किंवा आक्षेपार्ह व्हिडिओज शेअर करण्यात येतात. आता व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची किंवा खोटी माहिती पसरवणे तुम्हाला महागात पडू शकते. पोलिसांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या, अफवा पसरविणार्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाराणसीचे एसएसपी योगेश्वर मिश्रा यांनी एक संयुक्त आदेश काढत म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप ग्रुप चालविणार्या अॅडमिनने सावधान व्हावे. जर त्यांच्या ग्रुपमध्ये चुकीची माहिती, अफवा पसरविणारी पोस्ट मिळाल्यास संबंधित व्यक्तीसोबतच ग्रुप अॅडमिन विरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. सामान्यत: सोशल मीडियातील बातम्यांच्या नावावर बनविण्यात आलेल्या ग्रुप आणि अन्य नावाने बनविलेले ग्रुपमध्ये कधीकधी असे मेसेजेस येतात की त्याच्या सत्यतेसंदर्भात शंका असते. मात्र, कुणीही यासंदर्भात क्रॉसचेक न करता थेट मेसेजेस फॉरवर्ड करण्यास सुरुवात करतात. हे सर्व लक्षात घेऊनच सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्स अॅडमिन तसेच ग्रुपमधील सदस्यांसाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत.
अॅडमिनला सूचना
ग्रुप अॅडमिन तोच व्यक्ती असावा जो संपूर्ण ग्रुपची जबाबदारी घेण्यास समर्थ आहे.
आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांशी ग्रुप अॅडमिनचा परिचय असावा.
ग्रुपमधील एखाद्या सदस्याने चुकीची माहिती, बातमी किंवा अफवा पसरविणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास ग्रुप अॅडमिनने तत्काळ त्या पोस्टचं खंडन करत त्या सदस्याला ग्रुपमधून काढले पाहिजे.
अफवा, सामाजिक वाद या संदर्भात काही पोस्ट अपलोड झाल्यास त्या संदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी.
ग्रुप अॅडमिनद्वारे कारवाई न झाल्यास या प्रकरणी त्यालाही दोषी मानले जाईल आणि त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.
दोषींविरोधात आयटी अॅक्ट, सायबर क्राईम आणि आयपीसीच्या कलमनुसार कारवाई केली जाईल.