व्हॉट् अ‍ॅपवरून आता पाच वेळाच मेसेज फॉरवर्ड होणार

0

नवी दिल्ली ।व्हॉट्स अ‍ॅपच्या भारतीय युजर्सना यापुढे एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड करता येणार आहे. एक मेसेज पाच वेळा फॉरवर्ड झाला की फेसबुक इंक कंपनी त्यावरचा फॉरवर्डचा आयकॉनच डिसेबल करणार आहे. देशभरात घडलेल्या जमावाकडून मारहाणच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय व्हॉट्स अ‍ॅप युजर्स जगातल्या अन्य कोणत्याही देशातल्या युजर्सपेक्षा अधिक फॉरवर्ड्स करतात. असे व्हॉट्स अ‍ॅपचे निरीक्षण आहे. फेसबुकच्याच मालकीच्या असलेल्या या कंपनीचे जगभरात एक अब्ज युजर्स आहेत. यापैकी दोन कोटी युजर्स भारतात आहेत.

फेसबुक इंक या कंपनीद्वारे मेसेज फॉरवर्डींगवर नियंत्रण आणण्याची चाचणी करत असून, जी प्रत्येक व्हॉट्स अ‍ॅप युजरसाठी केली जाईल. भारतात ही मर्यादा पाच मेसेजपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मीडिया मेसेजमधील फॉरवर्ड बटण डिसेबल होईल, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने ब्लॉगपोस्टमध्ये दिली आहे.

देशभरात व्हॉट्स अ‍ॅपवरून पसरलेल्या अफवांमुळे जमावाकडून मारहाणसारखे गंभीर प्रकार घडल्यानंतर केंद्र सरकारने व्हॉट्स अ‍ॅपवर टीका करत नोटीस बजावली होती. गुरुवारी पुन्हा दुसरी नोटीस बजावून सरकारने व्हॉट्स अ‍ॅपला फेक न्यूज रोखण्यासंदर्भात परिणामकारक तोडगा काढण्यास सांगितले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्या अफवा ज्या माध्यमांतून पसरतात, त्या माध्यमांवर देखील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाला केंद्र सरकारने व्हॉट्स अ‍ॅपला दिला होता.