ज्येष्ठ व्हॉयलिन वादक संगीतकार प्रभाकर जोग यांचे मत
पुणे : मी व्हॉयलिनमधून केवळ सुमधूर स्वर नव्हे, तर त्या गाण्याचे बोल आणि भाव देखील प्रकट होतील. यादृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असायचो. ’गाणारे व्हॉयलीन’ हा त्याच प्रयत्नांचा परिपाक असल्याचे मत ज्येष्ठ व्हॉयलीन वादक प्रभाकर जोग यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या स्वरगंध प्रतिष्ठानतर्फे संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शिष्यवृत्तीचे प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोग होते. व्यासपीठावर स्वरगंध प्रतिष्ठानचे विश्वस्त सुरेश रानडे, शिरिषकुमार उपाध्ये, रवींद्र आपटे आणि अॅड. विनोद बापट उपस्थित होते.
वादनात अधिकाधिक अचुकता आणली…
या प्रसंगी, 2018 यावर्षासाठी अंकीता देवळे-दामले (गायन), स्नेहल नेवासकर (गायन), रोशन महादेव चांदगुडे (तबला वादन) या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र असे या शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे. जोग म्हणाले की, मी जेव्हा चित्रपटसृष्टीत होतकरु म्हणून काम करत होतो, त्यावेळी व्हॉयलिन वादनात अनेक दिग्गज होते. मला त्यांना जवळून अभ्यासण्याची संधी मिळाली. मी माझ्या वादनात अधिकाधिक अचुकता आणि सुरता कशी साधता येईल, या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहिलो.
गरजु मुलांना अर्थसहाय्य…
स्वरगंध प्रतिष्ठानचे विश्वस्त सुरेश रानडे म्हणाले, गुणी होतकरु परंतु गरजू गायक आणि वादक विद्यार्थ्यांना पुढील संगीत शिक्षणासाठी तज्ज्ञ गुरूंचे मार्गदर्शन लाभावे म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी पुढाकार घेतला. यासाठी प्रभाकर जोग यांच्या स्वरगंध प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने संगीत क्षेत्रातील होतकरू आणि तरूण गायक आणि वादक विद्यार्थ्यांना दोन वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. रवींद्र आपटे, शिरिषकुमार उपाध्ये आदी मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केले. उदयोन्मुख कलाकारांनी त्यांची कला सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक स्वरगंध प्रतिष्ठानचे विश्वस्त सुरेश रानडे यांनी केले, तर अॅड. विनोद बापट यांनी आभार मानले.