अहमदाबाद । भाजपमध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरू असतानाच गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट अनफॉलो केले आहे. नेमके याचवेळी प्रदेश काँग्रेस आयोजित आयटी सेल परिषदेलाही त्यांनी अनुपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे या परिषदेला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. वाघेला यांचे सोशल मीडिया सांभाळणारे पार्थेश पटेल यांनी मात्र सावरासावरी करत बापूंना (वाघेला) सोशल मीडिया वापरायचा बंद करायचा असल्याने त्यांनी सुमारे 30 ट्विटर हँडल अनफॉलो केल्याचे म्हटले.
गत आठवड्यात बडोदा शहरातील काही ठिकाणी लावलेल्या होर्डिंग्जवर वाघेला यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दाखवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या होर्डिंग्जमध्ये ते भाजपमध्ये सहभागी होणार असल्याचे संकेतही देण्यात आले होते. वाघेला यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला कोणता मतदारसंघ आवडेल, असे पत्रकारांनी विचारताच 77 वर्षीय वाघेलांनी आपण आयुष्यात अनेक निवडणुका लढल्या असून आता आपल्या आयुष्यात याला जास्त महत्त्व नसल्याचे त्यांनी म्हटले.