शंभर फूटी रस्ता झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे रखडला

0

धुळे । शहरात विकासाच्या नावाने बरेच काही होत असतांना केवळ महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे कोट्यावधी रूपये खर्च करून तयार झालेला शंभरफूटी रस्ता अवघ्या काही झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे रखडला आहे. संबंधित ठेकेदाराने मनपाला वारंवार सूचित करूनही गेल्या दोन वर्षात हे किरकोळ अतिक्रमण मनपाला काढता न आल्याने रस्त्यावर खर्ची झालेला निधी अनावश्यक ठरला आहे.

आजपर्यंत तब्बल 16 कोटी गेले पाण्यात
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहराच्या बाहेरून जाणार्‍या वळण रस्त्याला पर्याय म्हणून मालेगाव रोडवरील कोरकेनगर ते थेट पारोळा चौफूलीपर्यंतचा शंभरफूटी रस्ता तयार करण्यात येत आहे. कोरकेनगर ते चाळीसगाव रोडपर्यंत हा शंभरफूटी रस्ता तयार झाला असून परिसरातील नागरिक त्याचा वापरही करीत आहेत. मात्र चाळीसगावरोडच्या पुढे उत्तरेला रस्त्याच्या मधोमध काही झोपड्या येत असून मनपाने हे अतिक्रमण न काढल्याने रस्त्याचे काम खोळंबले आहे. आजवर या रस्त्यावर तब्बल 15 ते 16 कोटी रूपये खर्च झाले असून हा रस्ता महामार्गापर्यंत नेण्याचा मार्ग बंद झाल्याने रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत दिसत आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराने दोन वर्षांपासून महापालिकेकडे सतत तगादा लावूनही मनपाचे अतिक्रमण निर्मुलन पथक तिकडे फिरकले नाही. परिणामी, या झोपड्यांमुळे रस्त्याचे पुढील काम थांबले आहे. चाळीसगाव रोडवर येणारा पाईपलाईनचा अडथळा दूर करतांना ठेकेदाराने तत्परता दाखवून पाईप टाकून हा प्रश्‍न सोडविला. मात्र आता पुढे झोपड्या असल्याने व ते हटविण्याचे काम मनपाचे असल्याने नाईलाज झाला आहे. दोन वर्षात दोन झोपड्यांचे अतिक्रमण मनपाला हटविता न आल्याने मनपा प्रशासनाविरूध्द नाराजी व्यक्त होत आहे. कोरकेनगर ते चाळीसगाव रोड दरम्यानच्या या रस्त्याचा लाभ परिसरातील नागरिक घेत असून झोपड्यांचे अतिक्रमण निघाल्यास रस्त्याचे पुढील काम होवून हा शंभरफूटी रस्ता वापरात येण्याचा मार्ग खुला होणार आहे. मनपाने आतातरी यात लक्ष घालावे आणि हे झोपड्यांचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.