शक्तिकांत दास यांच्या निवडीवर सुब्रमण्यम स्वामी, कपिल सिब्बल यांचे आक्षेप !

0

नवी दिल्ली-नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि आपल्या वक्तव्यांमुळे भाजपला अडचणीत आणणारे खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची निवड सरकारने केली आहे. शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी निवड अत्यंत चुकीची असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. दास हे पी चिदंबरम यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे निकटवर्तीय असून त्यांना न्यायालयीन खटल्यातून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून माझा या निवडीला विरोध केल्याचे स्वामी यांनी सांगितले आहे.

आज सकाळी दास यांनी गव्हर्नरपदाची धुरा आपल्या हाती घेतली.

यापूर्वीही स्वामी यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. अनेकवेळा सरकारला त्यांच्यामुळे तोंडघशी पडावे लागले आहे. दास हे भ्रष्टाचारी नेत्यांचे जवळचे असल्याचे आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही दास यांच्या निवडीवर टीका केली. दास हे अर्थतज्ज्ञ नसून नोकरशाह आहेत. त्यांनी नोटाबंदीचे समर्थन केले आहे. आता सरकार जे सांगेल ते ऐकण्याचे काम दास करतील. आणखी एका संस्थेचे अस्तित्व संपुष्टात येणार अशी खंत सिब्बल यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.