शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

0

पुणे : पुणे महापालिकेतर्फे साजर्‍या करण्यात येणार्‍या गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार असणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले व स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

गणेशोत्सवावर आधारित खास थीम साँग, लोगो तयार केले जाणार आहेत. उत्सव जगाच्या कानाकोपर्‍यात पोचवण्यासाठी मोबाइल अप्लिकेशन, फेसबुक, इंस्टाग्राम यांचीही मदत घेऊन प्रसिद्धी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ढोल-ताशांचा एकत्रित वादनाचा कार्यक्रम आयोजित करून त्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंदवण्याचाही प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी होणार्‍या मंडळांच्या स्पर्धांसोबत यंदा वसाहतींसाठीही स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहराच्या मुख्य मार्गावरून दुचाकींची फेरी काढून सामाजिक संदेश देणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.

आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदाचा गणेशोत्सव फक्त या महिन्यातपुरता मर्यादित न राहता कार्यस्वरूपी लक्षात राहावा यासाठी गणपती भवन उभारणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी काही जागा डोळ्यासमोर असल्या तरी अद्याप जागेची निश्चिती झाली नसल्याचे ते म्हणाले. सभागृह नेते भीमाले यांनी यावेळी पुढील काळात इतिहासाची माहिती व्हावी म्हणून एक स्मरणिका प्रकाशित केली जाणार असल्याचे सांगितले.या वर्षीच्या उत्सवाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून सचिन तेंडुलकरला आणण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच देशविदेशातून येणार्‍या भाविकांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण देशभरातून मिळून 125 कलाकार येतील असा अंदाज त्यांनी वर्तवला.

छायाचित्रांमधून उलगडणार इतिहास
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महापालिका यांच्या वतीने 125 वर्षांच्या गणेशोत्सवाच्या इतिहासाची कहाणी सांगणारे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. ज्या मंडळांकडे किंवा व्यक्तींकडे उल्लेखनीय अशी जुनी छायाचित्रे असतील त्यांनी ती महापौर कार्यलय किंवा श्रमिक पत्रकार संघ नवी पेठ येथे जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले.