मुंबई : पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत मुंबईत इतकी मोठी बाजी मारणार्या भाजपाने, शनिवारी अकस्मात सगळ्यातून माघार घेतल्याने राजकीय शंका कुशंकांना ऊत आला आहे. यामागे भाजपाचे उदार धोरण आहे, की शिवसेनेशी पुन्हा जुळते घेण्याची घाई भाजपाला माघार घेण्यास भाग पाडणारी ठरली आहे? यातले रहस्य जाणकार उलगडू बघत आहेत. शुक्रवारपर्यंत महापौरपदी दावा करणार्या भाजपाने अचानक संपुर्ण माघार घेण्यामागे कुठले डावपेच आहेत? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच माघारीची पत्रकार परिषद घेण्याची घाई नजरेत भरणारी आहे.
सोमवारी विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत असून, त्यात काही दगाफ़टका होण्याच्या भितीनेच भाजपाने मुंबईवरचा दावा सोडला आहे काय? शिवसेनेच्या मंत्र्यांनी अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला होता. यानंतर सेना सत्तेतून पहिल्याच दिवशी बाहेर पडणार असल्याच्याही अफ़वा होत्या. पण अशा धमक्या नव्या नाहीत. यापुर्वी भाजपाने त्यांना दाद दिली नव्हती. मग यावेळी त्यात काय गंभीर आहे? त्याचे उत्तर शरद पवार यांच्या नांदेड भेटीत दडलेले असावे. त्यांनी अकस्मात तिथे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बोलणी करून आघाडीची सत्ता १७ जिल्हा परिषदेत आणायचा पवित्रा घेतला आणि पहिला नंबर मिळवल्याची भाजपाची नशा क्षणार्धात उतरलेली दिसते आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला, तर नुसत्या कपात सुचनेतूनही सरकार कोसळू शकते. अशावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पाठीशी उभी रहाण्यावरच भाजपाची गेली दोन वर्षे मदार होती. पवारांनी नांदेडला भेट देऊन तो विषय तात्पुरता निकालात काढलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली, तर देवेंद्र सरकार विनाविलंब अल्पमतात येणार आहे. पवार पाठीशी नसल्याची किंमत सत्ता गमावून मोजावी लागेल. तशा स्थितीत महापौर पदापेक्षाही मुख्यमंत्रीपद मोठे असल्याने, ही माघार खुद्द फ़डणवीसांनी जाहिर केलेली असावी. एकूणच पवारांच्या पाठींब्यावर केलेली विधाने आता भाजपाच्या अंगलट येत आहेत.