शनिपेठेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या

0

जळगाव। शहरातील शनीपेठतील शनी मंदिरासमोर असलेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या जुगार अड्डयावर तरूणाची मध्यरात्री डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना घडली असून बुधवारी सकाळी 9 वाजता साफसफाईसाठी गेलेल्या युवकाला रक्तबंबाळ अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. प्रविण सुरेश माळी (वय 30 रा.सत्यम पार्क, दूध फेडरेशन रोड) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, दोन तरूण जुगार अड्डयाच्या तळमजल्याकडे दगड घेऊन जातांना गल्लीतीलच एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून त्यांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. यातच शनिपेठ पोलिसांनी राहुल सपकाळे ह्या एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसर्‍या अद्याप फरार आहे.

अन् युवकाने कळविले
शनी पेठे भागातील शनी मंदिरासमोर वेलकम फोटो स्टुडीओ असलेल्या इमारतीच्या तळमजल्यात काही दिवसापूर्वीच पत्त्याचा अड्डा सुरु झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री उशिरार्पयत येथे काही जण जुगार खेळत होते. बुधवारी सकाळी 9 वाजता क्लबमधील सफाई कर्मचारी राज रणछोड साळी (वय 18 रा.कांचन नगर ) हा युवक पत्त्याच्या क्लबमध्ये साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याला प्रवीण कोळी याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना लागलीच त्याने बाहेरील लोकांना सांगितले.

संशयित सीसीटीव्हीत कॅमेर्‍यात कैद
पोलिसांनी लागलीच वेलकम फोटो स्टुडीओ समोरील माजी नगराध्यक्ष चत्रभूज सोनवणे यांच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास पंकज उर्फ भीमा अशोक वाणी (रा.विसनजी नगर) व राहूल सपकाळे (रा.कांचननगर) हे दोन जण बाहेरुन दगड घेऊन क्लबमध्ये जातांना दिसून आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतल्यानंतर 12 वाजता मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. भर चौकात खूनाची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यामुळे पोलिसांना संशयितांची ओळख पटली. राहूल सपकाळे याला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात आली. जुन्या भांडणातून खून झाल्याचे समोर आले.

एकाला घेतले ताब्यात
पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी लागलीच संशयितांच्या शोधार्थ पोलिस कर्मचार्‍यांना पाठविले. राहूल सपकाळे हा संशयित शहरातच असल्याची माहिती प्रधान यांना मिळताच त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांना राहूल याच्या शोधार्थ पाठविले. काही तासातच शनिपेठ पोलिसांनी काही तासातच राहूल याला ताब्यात घेतले. मात्र, पंकज उर्फ भीमा अशोक वाणी हा संशयित अद्याप फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी पंकज उर्फ भीमा अशोक वाणी या संशयिताचा मोबाईल ट्रेस केला असता तो मुंबई येथे असल्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले. लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.

यापूर्वीही दोघांमध्ये वाद
मयत प्रवीण व संशयित पंकज हे दोन्हीही जिवलग मित्र होते. अनेक वर्ष दोघं शनी पेठेत वास्तव्याला होते. दोन ते तीन वर्षापूर्वी प्रवीण याने पंकजवर ब्लेडने वार केले होते.त्याचा शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे ही हत्या त्याच वादातून झाली की पत्ते खेळतांना दोघांमध्ये काही वाद झाला होता, या दोन्ही बाजुंनी पोलीस तपास करीत आहेत.

शनिपेठ पोलिस घटनास्थळी
खून झाल्याची बातमी शनिपेठ भागात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. यानंतर शनिपेठ पोलिस स्टेशनला हत्या झाल्याची नागरिकांनी कळवताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान, एपीआय बेंद्र, पोलिस कर्मचारी जितेंद्र सोनवणे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, कंक तसेच शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी विजयसिंग पाटील, दृष्यंत खैरनार आदी कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. त्यानंतर रूग्वाहिका बोलवून प्रविण याचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर प्रविण याच्या नातेवाईकांनी तसेच मित्र मंडळींनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती.