जळगाव । घराजवळ पार्किंग केलेली प्रवासी रिक्षा जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या रिक्षेला कोणीतरी पेटवून दिली असावी, असा संशय रिक्षा मालकाने व्यक्त केला असून याप्रकरणी बुधवारी त्यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. सुनिल रामदास चौधरी हे शनिपेठ परिसरात मायक्कादेवी मंदिर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. प्रवासी रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
मंगळवारी शहरात व्यवसाय केल्यानंतर रात्री त्यांनी घराबाहेर त्यांच्या मालकीची रिक्षा क्रमांक एम.एच. 19 व्ही. 6222 ही पार्किंग केली होती. मंगळवारी मध्यरात्रीनंतर रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास रिक्षास आग लागली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रिक्षाला पेटविली, असा संशय रिक्षामालक सुनिल चौधरी यांनी व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार अर्ज सादर केला आहे. घटनास्थळी जावून पोलिसांनी माहिती जाणून घेतली