पुणे । राज्यात येत्या शनिवारपर्यंत दि. 16 राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर येत्या 24 तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने नमूद केले आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारीदेखील दुपारनंतर ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका तर विदर्भात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. सोमवारी रात्रीपासूनच विदर्भातील पावसाचा जोर वाढला असून तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही नोंद झाली.
नैर्ऋत्य राजस्थानच्या येथे हवेच्या वरच्या थरातील चक्रीवादळ निर्माण झाले असून वेस्टर्न डिस्टरबन्समुळे राज्यभर सध्या दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे. हिच स्थिती आणखी 3-4 दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरी 50 मि.मी, महाड 10 मि.मी, पेण 10 मि.मी, महाबळेश्वर 30 मि.मी, नगर 20 मि.मी, लोणावळा 20 मि.मी, बुलढाणा 30 मि.मी, वाशिम 10 मि.मी, यवतमाळ 10 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.