287 व्या वर्धापनानिमित्त कार्यक्रम; प्रतिमांचे पूजन
पुणे : पेशवाईच्या काळात पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यातून दिल्लीच्या राजकारणावर हुकूमत गाजवली, त्या वाड्याचा 287 वा वर्धापन दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला होता.
यावेळी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या शनिवारवाड्याच्या पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
10 जानेवारी 1730 रोजी भूमिपूजन
शेटे म्हणाले, 10 जानेवारी 1730 रोजी वाड्याचे भूमिपूजन झाले होते, तर 22 जानेवारी 1732 रोजी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती. शनिवारवाडा हा मराठेशाहीचा मानबिंदू आहे. जगात केवळ दोन ठिकाणी असलेल्या कारंज्यांपैकी एक कारंजे शनिवारवाड्यात आहे. तर कात्रजपासून आणलेली दगडी पाइपलाइन हे देखील मागील 200 वर्षांपासून आजपर्यंत पाणी पुरविणारे आश्चर्य आहे.
उदयसिंह पेशवा म्हणाले, शनिवारवाड्याचा 287वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात पार पडत आहे. मागील काळापूर्वी ‘शनिवारवाडा हटाओ,’ ही मोहीम झाली. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. वाड्यातील अनेक गोष्टींची दुरवस्था झाली असून, मेघडंबरीच्या लाकडाला कित्येक महिन्यात पॉलिशही करण्यात आलेले नाही.