पुणे-छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती अशा शिवमय वातावरणात शिवरायांना मानवंदना देत शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ५१ फूट स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन शनिवारवाडयाच्या ऐतिहासिक प्रांगणात मोठया उत्साहात साजरा झाला.
शिवराज्याभिषेकाच्या ३४५ व्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मराज हांडे महाराज, समितीचे संस्थापक अध्यक्ष व स्वराज्य गुढीचे संकल्पक अमित गायकवाड, समन्वयक सुनील मारणे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, शांताराम इंगवले यासह असंख्य पुणेकर उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील सर्व स्वराज्य घराणी यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभारण्यात आली. फर्जंद सिनेमातील कलाकार देखील यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ ढमढेरे, सचिन पायगुडे, अनिल पवार, किरण देसाई, महेश मालुसरे, रवींद्र्र कंक, शंकर कडु, कुमार रेणुसे, गिरीश गायकवाड, दिपक घुले, किरण कंक, समीर जाधवराव, दिग्वीजय जेधे, निलेश जेधे, मंदार मते, मयुरेश दळवी, यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले.