शनिवार वाड्यावर राजकीय सभांना परवानगी द्यावी

0

प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव संजय बालगुडे यांची मागणी 

पुणे : शनिवार वाड्यावर कोणत्याही राजकीय कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव संजय बालगुडे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार वाडा राजकीय सभासाठी भाड्याने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जुन शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवार वाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनाला देखील वेगळी ओळख मिळाली आहे. याच शनिवारवाड्यावर 31 डिसेंबर 2017 रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयू छात्र संघटनेचा उमर खलिद यांच्या वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगावभीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर यापुढे शनिवार वाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शनिवार वाडा राजकीय सभांसाठी उपलब्ध करून देऊ नये असे आदेश महापालिकेने काढले आहेत. तसेच अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी पोलिस परवानगी व एनओसी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शनिवार वाड्या लगतच संवेदनशील परिसर असून, शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या भागात एखाद्या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कार्यक्रमामुळे येथे मोठी वाहतूककोंडी देखील होत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने कळविण्यात आले आहे.राज्याच्या विविध भागातून विद्यार्थ्यांच्या सहली येतात. येथे होणार्‍या कार्यक्रमांमुळे बाहेरून येणार्‍याना आनंद घेता येत नाही. याबाबत बालगुडे म्हणाले, महापालिकेने जागा भाड्याने दिल्यावर पोलिसाची परवानगी घेणे गरजेचे नाही. शनिवार वाड्यावर सभा ही पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहे. त्यामुळे आपण त्वरीत आदेश देऊन राजकीय सभा, कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी लेखी मागणी त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे.