मुंबई : ऐन शपथविधी वेळी केंद्रीय नेतृत्वाला वेठीस धरण्याची जी चूक एकनाथ खडसे यांनी केली तीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाली आहे. खडसे यांना पक्षाने दिलेली कठोर शिक्षा देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार नाही हे मात्र तेव्हढेच खरे.
खडसेंनी ती हिंमत दाखवली
2014 च्या निवडणुकीत भाजपने बहुमत घेत सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत ज्येष्ठ तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना भाजप युती तोडल्याची घोषणा केली. युती तोडल्याचे जाहीर करण्याची हिंमत एकाही नेत्याने दाखवली नव्हती . हे खडसे यांनी करून दाखवलं. सर्वच जागा लढवल्यामुळे अधिकच्या जागा भाजपला जिंकता आल्या. सत्ता स्थापनेवेळी भाजप गटाचा अध्यक्ष कोण ? याची तयारी सुरू झाली. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, प्रदेश अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस सारे स्पर्धेत असल्याने भाजपात गट पडले. प्रत्येक गटाने आमदारांच्या बैठक घेतल्या. पण केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वच नेते एक झाले. यापरही केंद्राने आपली भूमिका कायम ठेवली. नेतेपद जाहीर करण्याचं काम सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले.
शपथविधीवेळी खडसे झाले होते नाराज
शपथविधीला पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि अमित शहा दाखल झाले. ऐन शपथविधी सुरू होताच एकनाथ खडसे नाराज झाले. मंत्री पदाची शपथ घेणार नाही सांगत स्वतःला दूर ठेवले. भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर आणि खडसे यांचे समर्थक यांनी मोठी मनधरणी करत खडसे यांना व्यासपीठावर आणले. हे त्यावेळी सर्वच नेत्यांनी अनुभवले. खडसे व्यासपीठावर येताच भाजपच्या सर्वच नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. खडसेंना मंत्री पदाबरोबर 12 खाती मिळाली. संपूर्ण देशात मोदी शहा यांचा डंका असताना त्यांच्या विरोधात हे देशातील एका राज्यातील बंडच होते. पुढे सत्ता स्थिर झाल्यावर एकनाथ खडसे यांचे काय झालं हे सार्या देशाने पाहिलं.
सात वर्षानंतर घटनेची पुनरावृत्ती
तब्बल 7 वर्षानंतर महाराष्ट्रात या घटनेची पुनरावृत्ती झाली. सत्ता स्थापनेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील ही भूमिका पक्षाने दोन दिवस आधीच घेतली होती. असे असताना मी सत्तेबाहेर राहिल, ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यावर केंद्रीय नेतृत्वाने जाहीरपणे हे पद स्वीकारा हा दिलेला इशारा देशात भाजपात विशेषतः मोदी शहा यांच्या कालखंडात पहिल्यांदा घडला. देवेंद्र फडणवीसांसारख्या दिग्गज नेत्याला असे जाहीर इशारा देणे हे भाजपात पहिल्यांदा घडले आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत राहतील.
पक्ष शिरस्तादेखील महत्वाचा
जे काही करतोय ते मी स्वतःसाठी नव्हे तर पक्ष वाढविण्यासाठी हे करतोय ही भूमिका एके काळी स्व.गोपीनाथ मुंडे यांनी घेतली त्यानंतर एकनाथ खडसे यांनी तीच भूमिका घेतली. आता देवेंद्र फडणवीस यांच्याडून तेच घडलं आहे. ही नेत्यांची भूमिका खरी जरी असली तरी पक्ष एका नेत्याच्या दावणीला बांधायचं नाही हा पक्षाचा शिरस्ता देखील तेव्हढाच प्रभावी आहे हेही नेतृत्वाने ओळखणे गरजेचे आहे.