शपथविधी होईपर्यंत शरद पवारांची भीती: आ. बच्चू कडू

0

मुंबई: राज्यात नवे समीकरण घडून शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मिळून सत्ता स्थापन करत आहे. दरम्यान ‘नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचं काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण, जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसं कळणार,’ असं वक्तव्य ‘प्रहार’ संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. सध्याच्या घडामोडींबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनीआपली मतं मांडली. नव्या आघाडीचे मुख्यमंत्री कोण व्हावेत असं विचारलं असता तो शिवसेनेचा निर्णय असेल असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास चांगलं असेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषत: शरद पवारांच्या राजकारणाबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली. ‘राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची मानसिकता नव्हती. शपथविधी होईपर्यंत शरद पवार काय निर्णय घेतील सांगता येत नाही. ती भीती आम्हाला आहे,’ असं कडू म्हणाले. राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार येणार असंच आम्ही सुरुवातीला गृहित धरलं होतं. मात्र, नंतर राजकारण बदललं. महाराष्ट्राच्या भल्यासाठीच हे झालेले आहे असं समजून हा बदल आता स्वीकारावा लागेल, असंही ते म्हणाले.

‘राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी संपर्क केला होता. पण मी उद्धवजींना शब्द दिलेला होता. शब्दापेक्षा महत्त्वाचं काहीही नसते. त्यामुळे मी त्यांचा प्रस्ताव नाकारला. माझ्याप्रमाणेच भाजपनं इतरांशीही संपर्क केलेला असू शकतो. स्वत:चा पक्ष मजबूत करण्याचे काम प्रत्येक जण करणारंच. इथं कोणी पुजारी थोडीच आहे,’ असे ही बच्चू कडू म्हणाले.