तिरुअनंतपूरम : शबरीमला मंदिर सर्व वयोगटातील महिलांना खुले करण्याच्या आदेशाचं पालन करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी मंदिर समितीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात असून सदर याचिका आज (शनिवार) किंवा सोमवारी रोजी दाखल करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणे, राज्य सरकारचं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होऊन सर्वोच्च न्यायालयात वेळ वाढवूनमिळावा यासाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत मंदिर समितीमध्ये दुमत नाही. मात्र, मंदिरातील भाविकांचा ओढ वाढणार आहे, यासाठी मंदिर प्रशासनाला पूर्वतयारी करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ वाढवून मिळण्याबाबत न्यायालयाला विनंती केली जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी दिली.