थिरूवनंतपुरम- केरळमधील शबरीमाला मंदिराचा वाद अजूनही संपलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे घोषित केले आहे. मात्र अद्यापही महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेले नाही. महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेला शबरीमला वाद ही पक्ष म्हणून भाजपासाठी सुवर्णसंधी असल्याचे विधान केरळचे भाजपा अध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लाई यांनी केले आहे. यामुळे श्रीधरन व भाजपा टिकेचे लक्ष्य होऊ शकतात. एक ध्वनीफित सध्या व्हायरल झाली असून यामध्ये श्रीधरन शबरीमला मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. जर महिलांनी या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर गाभाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात येतील असे सांगत आहे.
ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मी कायदेशीर सल्ला देत होतो असे श्रीधरन म्हणाले, मात्र त्यांनी सुवर्णसंधी या शब्दाच्या उपयोगाबद्दल भाष्य करणे टाळले. जर शबरीमलासारख्या वादाकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पक्षासाठी सुवर्णसंधी या दृष्टीकोनातून बघत असतील तर हे प्रकरण त्यांच्यावर शेकू शकते.