शबरीमाला मंदिरात जाण्यास दोन महिलांना मज्जाव !

0

तिरुअनंतपूरम : केरळातील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा वाद संपता संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश दिलेले असतांना देखील महिला प्रवेशाला विरोध होत आहे. दरम्यान आज प्रवेश करण्याच्या प्रयत्नातील दोन महिलांना निदर्शकांनी रोखून परत पाठवले. अय्यपा मंदिरात प्रतिबंधित वयोगटातील महिलांना दर्शनाची परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही आडकाठी सुरूच आहे. या आधी दोन महिलांनी तेथे पोलीस संरक्षणात प्रवेश करून ही प्रथा मोडली होती.

रेश्मा निशांत व शनिला या कन्नूर जिल्हय़ातील दोन महिलांनी पहाटेच्या वेळी टेकडी चढून जाऊन मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हातात इरुमुडेकेटू म्हणजे देवाला अर्पण करण्याच्या वस्तू असल्याने त्यांची ही चाल लक्षात येऊन निदर्शकांनी त्यांना नीलीमला येथेच रोखले व नंतर त्या दोघींना पकडून खाली आणण्यात आले. सकाळी सात वाजता त्यांना पंबा तळावर आणून सोडल्यानंतर त्या एरुमेलीकडे निघून गेल्या. या दोन महिला काही पुरुषांसमवेत आल्या होत्या. निशांत हिने सांगितले, की संरक्षण मिळावे यासाठी आम्ही पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सांगितले, की या दोन महिला आता पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी मंदिर प्रवेशासाठी उपोषण सुरू केले आहे.

२ जानेवारीला मल्लापूरम येथील कनकदुर्गा (वय ४४) व कोझिकोड जिल्हय़ातील बिंदू (वय ४२) यांनी मंदिरात प्रवेश करून शतकांची परंपरा मोडीत काढून इतिहास घडवला होता. त्यानंतर पुजाऱ्यांनी मंदिराचे शुद्धीकरण केले होते.