थिरुअनंतपूरम- केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद (एएचपी) या हिंदुत्ववादी संघटनेने केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देऊ नये, अशी मागणी या संघटनेने केली आहे.
सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबर रोजी अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले होते.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात केरळमधील आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद (एएचपी) या हिंदुत्ववादी संघटनेने केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. १८ ऑक्टोबरपासून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. केरळ सरकारला महिलांना प्रवेश देऊ नये, यासंदर्भात निर्देश द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या याचिकेवर आता केरळ हायकोर्ट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.