शबरीमाला मंदिर: महिलांचा प्रवेश विनाशकारी-भाजप

0

थिरुअनंतपूरम- केरळमधल्या शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात दोन महिलांनी प्रवेश करून आज इतिहास घडविला आहे. दरम्यान भाजपने याविरोधात प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी दर्शन घेतल्याची घटना विनाशकारक असल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे. आज पहाटे बिंदू व कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या महिलांनी शबरीमलामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात प्रवेश केला व शेकडो वर्षांची परंपरा मोडली.

सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिल्यानंतर प्रचंड विरोधाचा सामना मंदिरात जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना करावा लागला होता.

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळण्याची ग्वाही दिली व महिला भाविकांना पुरेपूर बंदोबस्त देण्याचे मान्य केले. परंतु या निर्णयाच्या अमलबजावणीस प्रचंड विरोध झाल्यामुळे अद्याप महिलांनी मंदिर प्रवेश केला नव्हता. मात्र, आज पहाटे दोन महिलांनी परंपरा मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाचे माहिती व तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी ही घटना खरी असेल तर ती विनाशकारी असल्याचे ट्विट केले आहे. याआधीही भाजपाच्या केरळमधल्या नेत्यांनी परंपरा मोडण्यास विरोध केला होता.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनीही प्रार्थना करायचा अधिकार असला तरी पवित्र स्थळाचा अपमान करायचा आपल्याला अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मी हिंदू आहे, माझा पती पारशी आहे आणि मला पारशांच्या अग्निमंदिरात प्रवेश करून प्रार्थना करायला बंदी आहे असे सांगितले व शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश नसण्याचे समर्थन केले होते.