शबरीमाला मंदिर वाद: आज केरळबंदमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू !

0

थिरूवनंतपुरम- काल शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला. परंपरा मोडत पहिल्यांदाच महिलांनी मंदिरात प्रवेश केला आहे. खर तर ही एक ऐतिहासिक घटना आहे. परंतू याला विरोध देखील होत आहे. महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ केरळमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. शबरीमला कृती समितीने हा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना शबरीमला कृती समिती अंतर्गत एकटवल्या आहेत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा या कृती समितीला पाठिंबा आहे. दरम्यान हिंसक विरोध प्रदर्शनादरम्यान जखमी झालेल्या एका आंदोलकाचा रात्री मृत्यू झाला.

दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केरळमध्ये हिंसक आंदोलनाच्या रुपात त्याचे पडसाद उमटले होते. मृत आंदोलक भाजपाचा कार्यकर्ता असून या प्रकरणी सीपीएमच्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिलांनी भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतल्यानंतर शुद्धीकरणाच्या विधीसाठी म्हणून मंदिर काहीवेळासाठी बंद करण्यात आले होते.

केरळमधल्या अनेक भागात कडेकोट बंद पाळण्यात येत आहे. कोचीमध्ये भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. रस्ते ओस पडले आहेत. रस्त्यावर नेहमीसारखी वर्दळ नसून एखाद-दुसरे वाहन दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा निकाल दिला होता. पण भाजपाचा सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध आहे. केरळ भाजपा अध्यक्ष पी.एस.श्रीधरन पिल्लाई यांनी कायद्याचे पालन करुन शांततेत आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी दुपारी केरळमध्ये जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आली. वाहतूक रोखण्याचा प्रयत्न झाला. अनेक बस गाडयांचे नुकसान करण्यात आले.