थिरूवनंतपुरम-परंपरा खंडित करत दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या केरळ बंदला हिंसक वळण लागले. बंददरम्यान वाहनांची आणि दुकानांची मोडतोड करण्यात आली असून काही ठिकाणी माकपच्या कार्यालयांवर आणि पोलीस ठाण्यांवर हल्ले करण्यात आले. या हिंसाचाराप्रकरणी केरळमध्ये एकूण ७४५ जणांना अटक करण्यात आली. तर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ६२८ जणांना ताब्यात घेण्यात आले. या हिंसाचारात १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
दोन महिलांनी बुधवारी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने गुरुवारी केरळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. शबरीमला कर्म समिती आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने या बंदची हाक दिली होती. कोळिकोड, कन्नूर, मलप्पुरम, पालक्काड आणि तिरुवनंतपुरममधील अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि पाण्याचे फवारेही मारले. त्रिशूरमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी असलेल्या सोशल डेमॉकॅट्रिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) कार्यकर्त्यांशी उडालेल्या चकमकीत भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांना भोसकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन ठिकाणी आंदोलकांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. तर काही ठिकाणी माकपच्या कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आले. कन्नूर जिल्ह्यात थलासेरी येथे माकप नेते चालवत असलेल्या एका बिडी कारखान्यावर निदर्शकांनी गावठी बॉम्ब फेकला, मात्र त्याचा स्फोट झाला नाही. एर्नाकुलम आणि मलप्पुरम जिल्ह्यांतील माकपच्या कार्यालयांवर दगडफेक झाली. या हिंसाचारात ३१ पोलीस जखमी झाले आहेत. या हिंसाचारासाठी भाजपा आणि संघ जबाबदार असून दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले.
राज्यपाल पी. सदाशिवम यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडून अहवाल मागवला आहे. बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत त्यांनी माहिती मागितली आहे. दरम्यान, हा हिंसाचार सुरु असतानाच काल श्रीलंकेतून आलेल्या एका महिलेनेही शबरीमला मंदिरात प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले.