अमळनेर ईदगाह मुस्लिम कब्रस्तान कमेटीचे आवाहन
अमळनेर : शब ए बरातची ९ रोजी होणारी नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरीच अदा करावी असे आवाहन ईदगाह मुस्लिम कब्रस्तान कमेटीतर्फे करण्यात आले आहे.
शहर ईदगाह मुस्लिम कब्रस्तान कमेटीतर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या रूग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे. त्यासाठी ९ एप्रिल रोजी येणार्या शब ए बरातसाठी मुस्लिम धर्मियांनी घराबाहेर पडू नये. कब्रस्तानमध्ये येवून प्रार्थना करू नये. तसेच शब ए बरातची नमाज मशिदीत देखील अदा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी दोन शुक्रवार (जुम्मा) ची नमाज घरी बसूनच अदा केली आहे. शब ऐ मेराज सुध्दा घरातच साजरी करण्यात आली आहे. म्हणून शब ए बरातची सुद्धा प्रार्थना घरीत करून कोरोनाच संकट परतुन लावतील व राष्ट्राच्या सुरक्षिततेला सहकार्य करतील असा निर्धार यावेळी करण्यात आला.