शरद पवारांचाही भाजपवर हल्ला!

0

पुणे : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार निष्क्रिय आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे. नोटाबंदीपासून ते जीएसटीपर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढविला. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला पर्याय दिला पाहिजे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी याप्रसंगी केले. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे तीन वर्षांपूर्वी विचारत होते, मात्र आता महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे दिसतंय, असा टोलाही पवारांनी राज्य सरकारला लगावला. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोखठोक भूमिका मांडली, तसेच वाढत्या महागाईवरून सरकारवर टीकाही केली.

सरकारला महागाईवर नियंत्रण ठेवता आले नाही!
एकापाठोपाठ कार्यक्रम असल्याने शरद पवार हे दोन दिवसांपासून पुण्यातच मुक्कामी आहेत. शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरातील कार्यक्रमानंतर शनिवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना पवारांनी अत्यंत आक्रमक शैलीत आपली भूमिका मांडली. पवार म्हणाले, नोटाबंदीने जनता होरपळली आहे. लहान व्यावसायिक मंदीमुळे कंटाळले आहेत. यापूर्वी कधीही अशी स्थिती नव्हती. त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र सरकार ते करायला तयार नाही. सरकारला महागाईवर नियंत्रण ठेवला आलेले नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेला आगीत टाकणारा ठरला आहे. पेट्रोल, डिझेल यांची भाववाढ थांबवणे सरकारला शक्य होते, मात्र त्यांनी ते केलेले नाही. आता सगळ्या निर्णयामागचे गणित जनतेलाही कळते. महागाईमुळे सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचा विचार करून सरकारी निर्णय झाले पाहिजेत, मात्र तसे दिसत नाही. अशा वेळी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसे केले तरच चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो, असे मत पवार यांनी व्यक्त करून राजकीय गुगलीही टाकली.

शिवसेना आक्रमक अन् पवारांची बदलली भूमिका..!
पुढील राजकीय रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक 3 ऑक्टोबररोजी मुंबईत ठेवली आहे. पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित असतील. त्यात देशातील, राज्यातील सध्याच्या स्थितीवर विचार करण्यात येईल, असे सूचक विधानही पवारांनी केले आहे. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. सध्याच्या घडीला देशातील जनता ही विरोधकांकडे पर्याय म्हणून पाहते आहे. आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. लवकरच आम्ही समविचारी पक्षांसोबत चर्चा करून, पुढील पावले उचलणार आहोत. नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वीच आपण सबुरीचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षही सोडला. आता त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. मात्र मागील तीन निवडणुकांमध्ये राणे यांना जनतेने नापसंती दर्शवली असे कोकणातले एक नेते म्हणाल्याचे मी वाचले आहे. यामुळे सिंधुदुर्ग भागातील लोकांना राणेंचा निर्णय कितपत रुचेल हा प्रश्‍न आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. शिवसेनेने भाजपसोबत घटस्फोट घेण्याची चालवलेली तयारी आणि पवारांंची बदललेली भूमिका पाहाता, राज्यात लवकरच राजकीय घडामोडीचे संकेत प्राप्त होत आहेत.