राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या दुसर्या टप्प्याचा समारोप
औरंगाबाद । राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रा सुरु केली. या यात्रेचा दुसर्या टप्पा मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकताच संपन्न झाला. याचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.3) औरंगाबाद येथे होत आहे.
औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीमय वातावरण
सकाळी 11 वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर दुपारी 2 वाजता भव्य सभा घेऊन दुसर्या टप्प्याची सांगता केली जाईल. समारोप सभेसाठी औरंगाबाद नगरी पूर्णपणे राष्ट्रवादीमय झाली आहे. सरकारविरोधातील बॅनर, राष्ट्रवादीचे झेंडे, पताका यांनी औरंगाबाद शहरात वातावरण निर्मिती झाली आहे. मोर्चा व सभेला माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील सर्व आमदार, सेलप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दिग्गज नेत्यांनी ठोकला तळ
याआधी 16 ते 24 जानेवारी दरम्यान मराठावाड्यातील आठही जिल्ह्यात राष्ट्रवादीने सभा गाजवल्या. हल्लाबोल मोर्चा व सभा यशस्वी करण्यासाठी शुक्रवारपासून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शहरात तळ ठोकला आहे. शुक्रवारी त्यांनी तयारीचा आढावा घेतला. सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चा व सभेला उपस्थित राहणार असल्यामुळे सरकारविरोधातला हा निर्णायक लढा असल्याचा विश्वास मराठवाड्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे.