शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातीलच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावरील एक दिग्गज नाव. ईशान्येकडील राज्यांपासून ते दक्षिण आणि उत्तरेकडील नेत्यांपर्यंत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बर्यापैकी जम बसवलेला हा नेता आहे. अनेकाची मती गुंग करणारा बारामती अवलीया आजही आपला राजकीय दबदबा ठेवून कायम आहे. परवाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ज्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देवून व्यासपिठावर स्थान देण्यात आले होते त्यात पवार हे एक होते. हे सार्या देशाने पाहिले. परंतू पवारांचा चिरेबंदी वाडा आता ढासळू लागला आहे. 1999 च्या निवडणुकी दरम्यान त्यांनी जन्माला घातलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड सुरू झाल्याचे चित्र सुरू आहे. राजकारणात निवडणुकीच्या धामधुमीत गळती आणि आवक ही सुरूच राहते हेही मान्य असले तरी 2014 पासून ज्या प्रमाणात राष्ट्रवादीला गळती लागली आहे ते पाहता पवारांचा वाडा खिळखिळा होत असल्याचे वास्तव मान्य करावे लागेल.
पवारांचा राजकिय प्रवासच मुळात या सार्या घटनांना कारणीभूत आहे. पहिल्यांदा 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश हा वयाच्या अगदी 29 व्या वर्षी झाला. पवारांनी कमी वयातच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहिली. 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण तेव्हा स्वस्थ न बसता काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर ‘पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया दिवंगत वसंतदादांनी दिली होती. 1978 ला शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचे फार मोठे योगदान होते. मात्र पवारांनी त्यांचीही पुढे आठवण ठेवली नाही. 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस(एस) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(आय) पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. तेव्हा शरद पवार यांना विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून बसण्याची पाळी आली.
मात्र सिमेंट घोटाळ्यात अंतूलेंना घरी बसवून पवार पुन्हा मुख्यंत्रीपदावर बसले. पवारांनी 1988-89 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी दलीत कार्डचा वापर केला. पँथर बरखास्त करून रिपब्लिकन ऐक्य झालेल्या नेत्यांना त्यांनी विश्वासात घएतले. रामदास आठवलेंना सोबत घेवून महाराष्ट्र पिंजून काढला आणि राज्यात सत्ता आणून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. नंतर त्या आठवलेंनाही पवारांनी दगा दिला. पवारांनी 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र त्यांची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, 12 मार्च 1993 ला मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत 257 लोक ठार तर 600हून अधिक लोक जखमी झाले. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा आला होता. गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, त्यात चेंगराचेंगरी होऊन 123 लोक मृत्युमुखी पडले. ती पाच वर्षे पवारांना मागे घेवू जाणारी ठरली. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात 1995 च्या निवडणुकीत पवारांचा पर्यायाने काँग्रेसचा पराभव झाला आणि शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. त्यातही पवारांची ग्यानबाची मेेख होती. पवारांनी बंडखोरी करायला लावलेले अनेक आमदार अपक्ष म्हणून निवडूण आले होते त्यांच्या पाठिंब्यावर युतीचे सरकर उभे राहिले. काँग्रेसच्या निष्ठावंतांना धडा देण्यासाठीच ही खेळी होती. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून पवारांनी राष्ट्रवादीची संकल्पना आणली खरी पण तेव्हा जोडलेला श्रीमंत मराठा शेतकर्यांचा वर्ग आणि बहुजनांचे नेते आता पवारांच्या खिशातून गळायला लागले आहेत. पवारांचा जादूचा खिसा सध्या फाटला आहे, असेच म्हणावे लागेल. डॉ. विजयकुमार गावीत, बबनराव पाचपुते यांच्यापासून ते काल राष्ट्रवादीत दाखल झालेल्या निरंजन डावखरेंपर्यंतची यादी मोठी आहे. आता ओबीसींचा दिग्गज नेता म्हणून ओळख असलेले छगन भुजबळ हेही असस्वस्थ आहेत. त्यंचे समर्थक आमदार आणि मुबंई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर हेही भाजपच्या वाटेवर आहेत.
माथाडींमध्येही पवारांचा दबदबा होता, परंतू त्यांचे नेते नरेंद्र पाटील हेही भाजपमध्ये कोणत्याही क्षणी प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मुंर्बतील माजी खासदार आणि दिना बामा पाटलांचे चिरंजीव संजय दिना पाटील यांनीही भाजपच्या वाटेने जाण्याची तयारी केली आहे. पवारांच्या साथीला आता दिग्गज असे नेते उरले नाहीत. भाजपमधून फोडून त्यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणले खरे परंतू धनंजय मुंडेंचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादीने नाशिकची जागा गमावली असून परभणी- हिंगोलीच्या बदल्यात घेतलेल्या लातूर- बीड- उस्मानाबाद मतदारसंघातही पक्षाचा उमेदवार अडचणीत असल्याची चिन्हे आहेत. त्यातच निरंजन डावखरे यांचा आमदारकीचा राजीनामा यामुळे विधान परिषदेतील सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या आता 21 वर आली आहे, तर शिवसेनेचे संख्याबळ 9 वरून 11 वर पोहोचले आहे. जुलै महिन्यात विधान परिषदेच्या आणखी चार जागांची निवडणूक होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटल्यास या पक्षाचे वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत मित्रपक्ष काँग्रेसकडूनच आव्हान दिले जाऊ शकते. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येण्याची शक्यता आहे. विधान परिषद सभागृहात 78 सदस्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे 23 आमदार होते. त्यातील जयंतराव जाधव, सुनील तटकरे, बाबाजानी दुर्रानी हे तिघे निवृत्त झाले. त्यातील रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीची संख्या 21 झाली आहे. त्यातच कोकण पदवीधरचे राष्ट्रवादीचे निरंजन तटकरे यांनी परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 20 वर आले आहे. जुलै महिन्यात परिषदेचे चार सदस्य निवृत्त होत आहेत. त्यातील निरंजन डावखरे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने हा मतदारसंघ गमावल्यास त्यांचे संख्याबळ 19 वर येईल. विधानसभा सदस्यांतून निवडून द्यायच्या सदस्यांत संख्याबळानुसार जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच सदस्य निवडून येऊ शकेल. त्यामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादीचे 18 आमदार उरतील. सध्या काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ 19 होते. लातूर-बीड-उस्मानाबाद येथून काँग्रेसचा उमेदवार निवृत्त झाला. परिणामी ही संख्या 18 झाली. अशा स्थितीत सभापती व विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे पद अस्थिर होण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा होता. या जागेची मतमोजणी अजून बाकी आहे.
लातूर बीड उस्मानाबादच्या जागेवर मोठे नाट्य घडले होते. राष्ट्रवादीतून सुरेशआण्णा धस यांनी काढता पाय घेत पंकजांच्या सावली खाली भाजपात प्रवेश केला त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पंकजाचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना राष्ट्रवादीत पळवून न्हेले होते. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रमेश कराड यांना थेट उमेदवारी दिली होती. परंतु पाच दिवसांत त्या पक्षात वाईट अनुभव आल्यामुळे ते निवडणुकीच्या मैदानातून माघारी फिरले. धनंजय मुंडे यांच्या मुळे ते राष्ट्रवादीत गेले आणि पंकजा मुंडेमुळे भाजपमध्ये परत फिरले, असे आता बोलले जाते.
एकंदरीत राष्ट्रवादीचा हा पडझडीचा प्रवास पहाता पवारांना आगामी काळात मोठ्या चतुराईने पुढे सरकावे लागेल. त्यांनी आपली पडझड होते आहे हे कळताच काँग्रेसलाही धक्के बसवले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व कसं फेल आहे हे राहूल गांधी आणि सोनिया गांधींना पटवून देण्यात ते यशश्वी झाले आहेत. आता राष्ट्रीय राजकारणात मित्र पक्षांना सोबत घेतल्याशिवाय आणि काँग्रेसने नरमाईचे धोरण स्विकारल्या शिवाय गत्यंतर नाही हे गांधी कुटूंबाला पटवण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे दिल्लीच्या वर्तूळात त्यांनी आपली जागा निर्माण करून ठेवला आहे. भुजबळ, मधुकर पिचड अशी मंडळी पवारांनी संपवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात आता हाताशी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, विजयसिंह मोहिते पाटील हीच मंडळी उरली आहेत. सातारची गादी त्यांच्या धाकात नाही. उदयनराजे कोणत्या क्षणी काय निर्णय घेतील याचा नेम नाही. त्यामुळे पवार भविष्यात महाराष्ट्रातील गणित कसे जुळवतात आणि फाटलेला खिसा कसा शिवतात हे पाहण्यासारखे असेल. दिवंगत शिवसेनाप्रनमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे शरद पवार हा अंगाला तेल लावलेला पैलवान आहे. तो कधीच कुणाच्या हातात सापडत नाही. तर आणखी एक बुध्दीजीवी पवारांना नेहमी मांजराची उपमा देत असे. मांजर जसे कुठूनही फेकले तरी ते नेमके चार पायावरच पडते आणि उभे राहते. तसे पवारांचे आहे. ते कधिही फसत नाहीत. त्यांच्या पंच्चहत्तीच्या गौरव समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे बरोबर वर्णन केले होते. वारा कोणत्या दिशेला वाहतो हे जर जाणून घ्यायचे तर ते पवारांना विचारावे. हे खरेच आहे.
– राजा आदाटे
वृत्त संपादक, मुंबई