शरद पवारांची तिसरी पिढी…

0
शरद पवार! महाराष्ट्र आडवा-उभा माहित असलेले एकमेव नाव. देशाच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. कामाचा अफाट आवाका, अचुक वेळ साधून सूचक विधान करण्याची कला, अजातशत्रू, राजकारणाच्या पलिकडे जावून नाती जपणारा माणूस. त्यामुळेच एखादी साधी बैठक असो, की दिल्लीतील केवळ फेरफटका हा चर्चेचा विषय ठरतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ते केंद्रस्थानीच असतात…आता 2019 साठी त्यांची तिसरी पिढी राजकारणात येत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ आपणच जिंकू अशा भ्रमात असणार्‍या भाजपसह शिवसेनेलाही जमिनीवर आणले आहे.
राज्याच्या राजकारणात पवार कुटूंबीय गेली 50 वर्षे सक्रीय आहे. शरद पवार यांनी बारामतीची आमदारकी घेवून राजकारणात प्रवेश केला. नंतर ते हवेली मतदारसंघातून खासदार झाले. या मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहरातील बराचसा भाग 2009 पर्यंत येत होता. त्यामुळे सातत्याने त्यांचा या शहराशी मोठा संपर्क आहे. मात्र, 2009 नंतर मावळ हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ झाला आणि पवारांच्या हातातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून तो निसटला. सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनाचा उमेदवार झाला. पहिल्यांदा गजानन बाबर व 2014 ला श्रीरंग बारणे खासदार झाले. पक्षाची ताकद असूनही राष्ट्रवादीला यश आले नाही. याला कारण म्हणजे पक्षातील बेदैली. सगळ्यांचे पायात पाय. विधानसभेत यश आणि लोकसभेत पराभव असे चित्र दहा वर्षे राहिले. गेल्या निवडणुकीत तर विद्यमान आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांना लोकसभा उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, याला नकार देत पक्षनेत्यांविरूद्धची धुसफुस बाहेर काढत पक्षच सोडला. यामुळे ऐनवेळी उमेदवार शोधण्याची नामुष्की आली होती. मग राहुल नार्वेकर यांच्यारुपाने शिवसेनेचा आणि तोही मुंबईमधील उमेदवार लादला गेला.
नार्वेेकर यांचा मतदारसंघाशी दुरान्वयेही संबध नसल्याने त्यांच्या वाट्याला पर्यायाने पक्षाला पराभव पत्करावा लागला. उमेदवार चक्क तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. 2019 साठी राष्ट्रवादीकडे उमेदवारच नसल्याने भाजप व शिवसेना पक्ष, इच्छुक उमेदवार खुशीत होते. त्यात भारतीय जनता पक्ष अशा समजुतीत होता, की आपला खासदार पक्का!  कारण पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला असला आणि स्वत: अजित पवार यांनी 15 वर्षांपासून अधिराज्य गाजवले असले,  तरीही 2014 पासून पक्षाच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. आधी विधानसभा, लोकसभा आणि नंतर महापालिकाही गमाविण्याचीही वेळ त्यांच्यावर आली. शहरातील 75 टक्क्याहून अधिक भाग मावळ लोकसभा मतदार संघात येतो. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला मताधिक्य मिळते तोच विजयी होते, असे समीकरण आहे. शिवसेनेला ताकदीपेक्षा इतर पक्षातील गटबाजीचा फायदा अधिक होत आला आहे. मात्र, यावेळी 2014 पासून भाजपाचा वारू सुसाट आहे.
या मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड व पनवेल या दोन मोठ्या महापालिकांसह लोणावळा, तळेगाव दाभाडे या नगरपालिका आणि ग्रामपंचायती त्यांनी काबीज केल्या आहेत. याचमुळे लोकसभा आरामात! अशा अविर्भावात भाजप होती. मात्र, शरद पवारांच्या गुगलीने सर्वजण जमिनीवर आले आहेत. कारण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी देण्याचे सुतोवाच झाले आहे. भाजपसह शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. मागील लोकसभेच्या निवडणूकांवेळी तसेच विधानसभेच्या निवडणूकांवेळी पार्थ याने राष्ट्रवादी काँगेसचे उमेद्वार आपलेच वडील अजित पवार यांच्या प्रचार दौर्‍यात सहभाग घेतला होता. हा सहभाग फक्त बारामती तालुक्यातच घेतलेला होता. त्यामुळे याची फार चर्चा झालेली नव्हती. आता धडकपणे मावळ या  लोकसभा मतदारसंघाची निवड केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांचे वारसदार म्हणून पार्थ यांच्याकडेच पाहिले जात होते यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. यामुळे या मतदार संघातील निष्ठावंतांसमोर व विरोधकांसमोर चांगलाच पेचप्रसंग उभा राहिला आहे. मागील लोकसभेच्या निवडणूकांवेळी तसेच विधानसभेच्या निवडणूकांवेळी पार्थ यांनी आपलेच वडील अजित पवार यांच्या प्रचार दौर्‍यात सहभाग घेतला होता. हा सहभाग फक्त बारामती तालुक्यातच घेतलेला होता. त्यामुळे याची फार चर्चा झालेली नव्हती. आता धडकपणे मावळ या  लोकसभा मतदारसंघाची निवड केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र मागील लोकसभा निवडणूकीत खासदार सुप्रिया सुळे या अवघ्या 68 हजार मतांनी काठावर निवडून आल्यामुळे चांगलेच धाबे दणाणले, याचीही आठवण या निमित्ताने होत आहे. त्याचमुळे ही कसरतीची लढाई असली तरी पवारांची तिसरी पिढी ही येणार्‍या निवडणूकीत सक्रीय होत आहे.
पवार कुटूंबियांतील अनेकांच्या उड्या राजकारणाकडे पडत असून गेल्या सहा वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमातून तयारी केली जात असल्याचे दिसून येत आहे. बारामती नजीकच्याच इंदापूर तालुका याकडेही लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मात्र सुप्रिया सुळे यांना येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कोणताही धोका पोहोचू नये याचीही दक्षता घेतली जात आहे. इंदापूर भोर या मतदार संघातून सुप्रिया सुळेंना काँग्रेसकडूनच कडवा विरोध आहे. याचमुळे मावळ या लोकसभा मतदार संघाची निवड केली आहे, हे आता लपून राहिलेले नाही. पार्थ यांचे शिक्षण मुंबई आणि पुण्यात झाले असले तरी अजित पवारांचा दांडगा जनसंपर्क व पवार कुटूंबियांवर असणारे प्रेम याचा फायदा घेण्याचा प्रयत्न यामागे आहे. सत्तेच्या चार वर्षाच्या काळात भाजपने ग्रामीण भागात बर्‍यापैकी कार्यकर्त्यांचे जाळे पसरविले आहे. तसेच ग्रामीण भागात चांगल्यापैकी मुसंडी मारलेली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पवार कुटूंबियांतील सदस्यांना मतदार संघाची निवड करताना जोखीम स्विकारावी लागत आहे. यातील एक भाग म्हणून मावळची निवड केली आहे. पार्थ यांचे नाव चर्चेने एक झाले, निवडणुकीला चार-पाच महिने उरले असतानाही निवडणुकीची सारी गणितेच बदलून गेली. तसेच राष्ट्रवादीने उसळी मारून निवडणुकीपूर्वीच बाजी मारली आहे. निकाल काहीही लागो, पार्थ यांना मिळो अथवा न मिळो; पण चर्चा रंगवून पहिला विजय मिळविला आहे.