मिरज । राजू शेट्टी आपले चांगले मित्र असून त्यांनी एनडीए सोडून कुठे जाऊ नये, शरद पवार जर ‘एनडीए’मध्ये आले तर त्यांचा तो योग्य निर्णय होईल, अशी तुफान बोलंदाजी करीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काल मिरजमध्ये अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत मते मांडली. त्यांच्या भाषणास तुफान टाळ्या मिळाल्या, हास्याची कारंजी उडाली.
मिरजमध्ये रिपाइंतर्फे झोपडपट्टी संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आठवले बोलत होते. काँग्रेस मागील 60 वर्ष सत्तेवर होती तरी त्यांनी 60 वर्षांच्या प्रदीर्घ काळात गावातील जातीयवाद का संपविला नाही, असा सवाल करून काँग्रेसने दलित अत्याचाराच्या प्रश्नाचे राजकारण करू नये, असे आवाहन आठवले यांनी केले. शहर तसेच ग्रामीण भागातील कच्ची घरे झोपड्यात राहणाऱ्या झोपडीवासीयांना चांगली पक्की घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगत झोपडीवासीयांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध असल्याचे आठवले यांनी सांगितले.
केंद्रिय मंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर पाहिल्यांदा आठवले मिरज मध्ये आले होते. त्यावेळी मिरजवासीयांच्या वतीने सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे आणि रिपाइंचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रामदास आठवले यांचे अभिनंदन करण्यासाठी मिरज आणि सांगलीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे हेमंत रणपिसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विवेक कांबळे यांनी पुन्हा नव्या जोमाने रिपाइंचा निळा झेंडा खांद्यावर घेत असल्याचे सांगत रिपाइंमध्ये जाहीर प्रवेश केला.