पार्थ पवारांसाठी लावली ‘फिल्डींग’
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यानंतर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आझम पानसरे यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत. या भेटीमुळे मावळ लोकसभा मतदार संघात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेनेकडे आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. पार्थ पवार यांनी मावळमधून लढावे, अशी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेत पार्थ यांना मावळची उमेदवारी जाहीर केली. पार्थ पवार यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीने पदाधिकार्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
पानसरे भाजपावर नाराज…
रविवारी पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शरद पवार पिंपरीमध्ये आले होते. सभेला जाण्यापूर्वी त्यांनी आझम पानसरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आझम पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. परंतु, 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशावेळी भाजपने त्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, साडेचार वर्षात भाजपकडून कोणतीही आश्वासन पुर्ती न झाल्याने ते भाजपवर नाराज आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीदरम्यान राजकीय खलबतेही झाल्याचे समजते.