शरद पवारांपाठोपाठ खडसे नागपुरात; चर्चेला उधाण !

0

नागपूर: भाजपमध्ये नाराज ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजप सोडणार अशी चर्चा आहे. खडसे यांनी जाहीररित्या पक्ष सोडणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. त्यांनी आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर परळी येथे गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी माझा भरोसा नाही मी कधीही पक्ष सोडू शकतो असा जाहीर इशारा देखील दिला होता. त्यानंतर आता एकनाथराव खडसे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

खडसे आज मंगळवारी रात्री नागपुरात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नागपुरात आहेत. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे. खडसे हे भाजपवर नाराज आहेत. मुलगी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना भाजपच्याच नेत्यांनी पाडल्याचा आरोप खडसेंनी जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होतीच, शिवाय दिल्लीत जाऊन शरद पवारांचीही भेट घेतली होती. एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र भाजप नेते भेटलेच नव्हते. तिथे त्यांची शरद पवारांसोबत चर्चा झाली होती. दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज खडसे पुन्हा पवारांना भेटण्याची शक्यता आहे.