शरद पवार अनाकलनीय!

0

देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे एक अनाकलनीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक अर्थ दडलेला असतो. ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते करतातच असा त्यांचा आजवरचा प्रवास सांगतोय आहे. अगदी अलिकडच्या घटनांवर जरी नजर टाकली तरी त्यातील सत्यार्थता लक्षात येईल. पाच वर्षांपूर्वी फक्त राज्यसभेच्या माध्यमातून संसदीय राजकारण करणार असल्याची त्यांची घोषणा होती. मात्र, 2019च्या सुरूवातीलाच पुन्हा लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले. मग पुणे मतदारसंघ निवडला, माघार घेतली. मग माढा निवडला, माघार घेतली. मावळमधून पार्थ पवार लढणार नाही असे घोषित केले. आता पुन्हा तोच उमेदवार असेल अशी घोषणा केली. हे एवढ्यावरच थांबणार की आणखी काही घडणार हे समजण्यासाठी आणखी काहीच दिवसांचा अवधी लागेल.

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पवारांनी लांग कसून पुन्हा शड्डू ठोकला आणि पुन्हा या व्यक्तिमत्वाविषयी चर्चा सुरू झाली. यामागील निवडणुकांमध्ये पवारांचे मताधिक्य किती असेल? मागील विक्रम मोडतील का? मताधिक्यात देशात त्यांचा कितवा क्रमांक असेल याविषयी पैजा लावल्या जायच्या, चर्चांचे फड रंगायचे. मात्र, ही पहिली निवडणूक अशी होती की प्रथमच त्यांच्याविरोधात ते विजयी होतील की नाही याविषयी शंका व्यक्त करणार्‍या होत्या. तसेच 2014 साली त्यांनी इथूनपुढे लोकसभा निवडणुक लढवणार नाही, राज्यसभेच्या माध्यमातून संसदीय राजकारण करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यालाही हरताळ फासून पुन्हा निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितल्यावर तर पंतप्रधानपदावर डोळा ठेवून हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात होते. एकूण काय तर पुन्हा चर्चेत राहिले. मात्र, कोणी कितीही आणि काहीही म्हणो; पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, पवार कुटुंबियामध्ये, नव्या पिढीतील कार्यकर्ते-नेते यामध्ये काहीतरी बिनसले आहे एवढे नक्की! महाराष्ट्रातील अगदी गावपातळीवरील साध्या कार्यकर्त्याला सुद्धा नावाने ओळखणारा नेता अशी पवारांची ख्याती आजही सांगितली जाते. परंतु, 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवारांच्या अगदी जवळची किंवा पक्षातील दुसर्‍या फळीतील माणसं भाजपात पळाली. पक्षाला प्रचंड पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीची उमेदवारी म्हणजे विजय पक्का असे समीकरण बिघडले. महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार मिळेनात. सगळीकडून पक्षाची वाताहत झाली. ज्यांना पक्षांतर करता आले नाही किंवा पवार प्रेमापोटी पक्षात थांबले त्यांचे पाच वर्षात पूर्ण खच्चीकरण झाले. मिरवावे असे एकही पद कार्यकारीणीत मिळाले नाहीच, शिवाय महापालिका, नगर परिषदांमध्ये कोणत्यातरी कामाची फाईल घेवून जावे म्हटले तर त्याला कोण लावेना. कारण इत्र तत्र सर्वत्र भाजपची सत्ता! त्यामुळे आपण भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेवून गुन्हाच केल्याची भावना त्यांच्यात प्रबळ झाली.

या पार्श्‍वभूमीवर व देशपातळीवर भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्याच्या कारणाचा लाभ घेता यावा म्हणून पवार यांनी निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला. आपला नेता पुन्हा रिंगणात आला. मात्र, पाच वर्षे सत्तेत नसूनही पवारांची धक्कातंत्राची सवय सुटली नव्हती. ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याविषयी चर्चा सुरू झाली. यातूनच पुणे मतदार संघाचे नाव पुढे आले. मात्र, अपेक्षित असा प्रतिसाद आला नाही. यानंतर काही दिवसांनी माढा मतदारसंघातील पक्षात एकोपा नसल्याने, एकाला उमेदवारी दिली तर दुसरा नाराज होईल आणि याचा पक्षाला फटका बसू शकेल. त्यामुळे लोकांचा आग्रह आहे म्हणून मी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे असे स्वत: पवारांनी कार्यकर्त्यांसमोर व प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितले. परंतू, जे बोलतील तेच करतील ते पवार कसले? निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांनी माढातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. हा निर्णय का घेतला? वास्तविक पवार सांगतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्ते घेतात असा इथला आजवरचा अनुभव आहे.

गेल्यावेळी मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटील म्हणून निवडून आले होते. मात्र, यंदा पवारांच्या मनात काय शिजत होते माहित नाही; पाटलांना कार्यकर्त्यांमधून विरोध आहे असे सांगत आपले एकेकाळचे शासकीय स्वीय सहायक प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. नंतर त्यांना मागे सारून स्वत:चीच उमेदवारी पुढे केली. याचे स्थानिक पातळीवर पडसाद उमटले. दिवसेंदिवस आपल्या उमेदवारीविरूद्ध स्थानिक पातळीवर नाराजी वाढत आहे हे लक्षात येताच त्यांनी माघार घेतली. यासाठी त्यांनी कारण सांगितले की बारामती मतदारसंघातून कन्या सुप्रिया सुळे व मावळ मतदारसंघातून नातू पार्थ पवार निवडणूक लढणार आहेत. मग एकाच घरातून किती जणांनी निवडणूक लढवायची? असा जनतेलाच उलट सवाल केला. आता पुन्हा गोम अशी की, पार्थ हा निवडणूक लढवणार नाही असे ठामपणे सांगितले होते. आणि आता पुन्हा ते उमेदवार असतील अशी आडून घोषणा केली. सांगायचे ते करायचे नाही अशा त्यांच्या स्वभावानुसार त्यांची ही वक्तवे होती. वास्तविक गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

या पडत्या काळात कोणत्याही लाभाविना, म्हणजे उपेक्षीत राहून पक्षाचे जे काम करत राहिले अशा कार्यकर्त्यांना आशा होती की आपल्याला निवडणुक लढवायची संधी मिळेल. माढामध्ये तेच झाले. खुद्द पवारच उमेदवार असल्याने कोण विरोध करणार नाही असे त्यांना वाटले होते. मात्र, पाच वर्षात अख्खी पिढी बदलल्याने स्वभावापासून व्यक्त होण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. या वातावरणाचा अंदाज इतक्या वर्षाच्या अनुभवाने पवारांना आला. विरोधकांनीही त्यांच्या विरोधात रान पेटविले होते. त्यांनी लोकसभा लढवलीच तर त्यांचा भाजप पराभव करेल, असेही भाकित काही मंत्र्यांनी केले होते. मावळमध्येही हेच झाले आहे. पार्थ पवारचे पुन्हा पुढे केले असले तरीही गेली तीन वर्षे पवारांच्या सुचनेनुसार सारा मतदारसंघ पाच-पाचवेळा पालथी घालणार्‍या इच्छुक उमेदवारांनी आता करायचे काय? असाही सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. पवारांना हे माहित नसेल? नक्की असेल; पण पवार घराण्यातील मतभेद, बदललेली राजकीय परिस्थिती याचबरोबर राज्यसभेची गमवावी लागणारी जागा यातून हे निर्णय घेतले असावेत, असे म्हणण्यास वाव आहे. मात्र, हेच चित्र कायम राहिल की पुन्हा पहिलेच किंवा दुसरेच चित्र निर्माण होईल हे समण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत वाट पहावी लागेल.