नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती आहे. अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत भेट होत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये केवळ सहकार क्षेत्रावरच चर्चा होणार की पडद्यामागून अन्य काही राजकीय डाव साधला जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला आहे. मोदी सरकार घेरण्यासाठी काँग्रेससह १४ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र यातच दिल्लीत आणखी एक राजकीय घडामोड घडताना दिसून येत आहे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडला जाऊ शकतो. अलीकडेच केंद्र सरकारने सहकार खाते नव्याने निर्माण केले आहे. या नव्या विभागाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे सोपवली आहे. सहकार हा विषय राज्यांशी संबंधित आहे मात्र केंद्राने हे नवं खातं तयार केल्यानं देशव्यापी सहकार क्षेत्र या विभागातंर्गत येणार आहे. सहकार क्षेत्राशी निगडीत काही अडचणी आणि समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत पवार-शहा भेट होणार आहे.