शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी!

0

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी एक वेगळा आदर आमच्या मनात आहेत, असे कौतुकोद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काढले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नांदगावकर बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह पालकमंत्री गिरीष बापट, खा. संजय काकडे, खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, पतंगराव कदम, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन देशमुख, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, अमृत महोत्सव गौरव समितीचे कार्याध्यक्ष दिलीप बराटे, अध्यक्ष नानासाहेब नवले, उल्हास पवार, अंकुशराव काकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांवर जोरदार फटकेबाजीही केली.

खा. संजय काकडे राजकारणातील फेरीवाले!
यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले, शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु, शरदरावांचे बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोकपण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. पण, पवारसाहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण) मिळाला, दुसरा पी (पंतप्रधान) कधी मिळणार? असा सवालदेखील नांदगावकर यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर तुमचे शिष्य काकडेंच्या वाढदिवसाला मी पुण्यात आलो होतो. व्यासपीठावर संजय काकडे व अंकुश काकडे या दोघांकडे पाहात ते पुढे म्हणाले, संजय काकडे नव्हे तर अंकुश काकडे यांच्या वाढदिवसाला आलो होतो. असे म्हणत खा. काकडे यांना टोमणा मारत, राजकारणात पण फेरीवाले असतात, असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. सध्या निष्ठावान कोणाला म्हणावे हे कळण्यास मार्ग नाही. आमचे कुठे सरकार नसल्याने काही काम नाही. पण, सद्या किमान फेरीवाल्याचा मुद्दा मिळाल्याने भारी काम झाले. परंतु, सद्या काही पक्षात वेगळ्याच फेरीवाल्यांचा विषय असतो, अशी जोरदार फटकेबाजीही नांदगावकर यांनी याप्रसंगी केली.

अशोकअण्णांनी मामासाहेबांचा वारसा जपला : पवार
मामासाहेब मोहोळ यांच्या वारसाला स्मरुण त्या वारसाशी बांधिलकी ठेवून मोहोळ कुटुंबीयांनी समाजातील शोषित, वंचित आणि उपेक्षित व्यक्तींशी असलेली नाळ कधी तोडली नाही. राजकारण, शिक्षण, समाजकारण, क्रिकेटविश्व अशा सर्वच क्षेत्रात उत्तुंग यश गाठूनही अशोकअण्णा मोहोळ यांनी मामासाहेबांचा नम्रतेचा आणि संस्काराचा वारसा पुढे चालू ठेवला, असे गौरवोद्गार याप्रसंगी शरद पवार यांनी काढून अशोक मोहोळ यांच्या कार्याचा गौरव केला. अमृत महोत्सवानिमित्त पवारांसह उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांच्याहस्ते यावेळी अशोक मोहोळ याचा सत्कार करण्यात आला. तसेच मीरा मोहोळ यांनाही सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी नांदगावकर व गिरीश बापट यांच्यात चांगलीच फटकेबाजी रंगली होती. माजीमंत्री पतंगराव कदम, खा. सुप्रिया सुळे, संग्राम थोपटे यांनीदेखील मनोगत व्यक्त करून मोहोळ यांच्या कार्याचा गौरव केला. सत्कार सोहळ्यास मोहोळ यांनी भावपूर्ण शब्दांत उत्तर दिले. गौरव समितीचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी प्रास्ताविक केले.

पुणेकरांची खंत दूर केली!
सदानंद आणि अशोक मोहोळ हे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत होते. पुढे चालून त्यांनी देशाचे नेतृत्वदेखील केले असते. मात्र काही कारणास्तव त्यांनी मध्येच क्रिकेट थांबवले. याबाबत जिल्ह्यातील लोकांच्या मनात खंत होती. परंतु, जगाच्या क्रिकेट संघटनेचे नेतृत्व करून मी पुणेकरांच्या मनात असलेली खंत दूर केल्याची आठवण शरद पवार यांनी सांगितली.