शरद पवार इतिहासजमा होतील, ठाकरेंना काळजी!

0

मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची एक मुलाखत घेतली. सोशल मीडिया असो किंवा इतर कोणतेही माध्यम या मुलाखतीवरून सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात अजूनही सुरूच असून या मुलाखतीमुळे शरद पवार इतिहासजमा होणार नाहीत ना? अशी काळजी ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून व्यक्त केली आहे. महाराष्ट्रापासून मुंबई कोणाला तोडता येणार नाही. विदर्भाचा तुकडा केकसारखा कापता येणार नाही या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचीच उजळणी शरद पवार यांनी त्यांच्या मुलाखतीतून केली. जातीपातीवर नको तर आर्थिक निकषांवर आरक्षण हवे हीदेखील बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका होती. तीच भूमिका शरद पवारांनी मांडली. गेली काही वर्षे बेरजेच्या राजकारणात तरबेज असलेल्या शरद पवारांचे गणित चुकते आहे. ऐतिहासिक मुलाखतीमुळे पवार तर इतिहास जमा होणार नाहीत ना? याची आम्हाला काळजी वाटते, असे सामनात म्हटले आहे.

शरद पवार हे बेरजेचे राजकारण करतात. मात्र, गेली काही वर्षे त्यांचे गणित चुकते आहे. त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीमुळे शरद पवार इतिहास जमा तर होणार नाहीत ना? अशी काळजी आम्हाला वाटते म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीवर शरसंधान केले आहे. पवार यांनी मांडलेली भूमिका फक्त टाळ्या मिळवण्यासाठी असावी. या भूमिकेवर त्यांना टाळ्या मिळण्याची शक्यता नाही. टाळी देण्यासाठी जो दुसरा हात लागतो तो त्यांच्या आसपासही दिसला नाही. कारण स्वतः शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते असले तरीही राजकारणातील त्यांच्या भूमिकांना स्थैर्य मिळालेले नाही, असे सामनात म्हटले आहे.