नवी दिल्ली । संयुक्त जनता दलाच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील ‘एनडीए’मध्ये सहभागी होणार असून आगामी मंत्रीमंडळ विस्तारात शरद पवार यांना स्थान मिळणार असल्याच्या माहितीने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेत्यांशी त्यांनी जवळचे संबंध आहेत. त्यांनी गडकरी यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थिती दिली होती.
चीन दौर्याआधी विस्तार
मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा या आठवड्यात विस्तार होणार आहे. मोदी हे चीनच्या दौर्यावर जाण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाशी भाजपशी बिहारमध्ये आघाडी झाली आहे. त्यामुळे या पक्षाच्या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वाहिनीने दिले आहे. त्यांना कृषिमंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
सुळेंचा पूर्णविराम
तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनी एनडीएतील सहभागाच्या वृत्ताचं खंडन केलं. गेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, पण या अफवा कोण पसरवतं, हे उद्योग नेमकं कोण करतं, हे कळत नसल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. तर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही या वृत्तांचे खंडन केले.