नागपूर: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यातच सत्ता स्थापनेच्या गोंधळामुळे सरकार बनू शकलेले नाही. त्याचा ही शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधवावर गेले आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली.
आज शरद पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांशी शरद पवारांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा दौरा शरद पवारांनी केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार कॉंग्रेस नेते आशिष देशमुख, अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. सध्या राजकीय घटना घडामोडी खूप वेगवान झाल्या आहेत, यात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, दरम्यान राजकारण थोडे बाजूला ठेवून शरद पवारांनी शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा व्यथा जाणून घेतल्या.