सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यात वर्तविले भाकित
पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुण्यात रविवारी हृदय सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. हाच धागा पकडत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती उपस्थित नसले तरी भावी राष्ट्रपती शरद पवार उपस्थित आहेत. शिंदे यांच्या या वक्तव्यावर पवार यांनी हात दाखवत नकार दर्शवताच, शिंदे यांनी पवार यांच्याकडे हात दाखवत त्याचा अर्थ हो असाच आहे. मी त्यांचेच बोट पकडून राजकारणात आल्याने मला ते ठाऊक आहे, असे म्हंटले आणि सभागृहात एकच खसखस पिकली.
राजकीय कारकीर्दीस 50 वर्षे पूर्ण
प्रतिभाताई पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. यानिमित्त सुशीलकुमार शिंदे बोलत होते. शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनावर आधारित भारताची प्रतिभा हा जीवनगौरव ग्रंथ आणि संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. देवीसिंह शेखावत, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, खासदार श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. त्रिपाठी आदी उपस्थित होते.
कात्रजचा घाट पवारांकडून शिकलो!
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रतिभाताई पाटील आणि शरद पवार यांच्याकडून मला बरेच शिकायला मिळाले. गरीब, शोषितांसाठी काम कसे करावे? माणसांची पारख कशी करावी? हे प्रतिभाताई यांच्याकडून शिकलो. तर कात्रजचा घाट कसा दाखवावा, हे शरद पवार यांच्याकडून शिकलो.
पवार यांच्याकडून चर्चेला पूर्णविराम
यावेळी शरद पवार म्हणाले, प्रतिभाताई पाटील यांनी अनेक महत्वाच्या पदांवर कामे केली आणि त्याला न्याय दिला. मात्र, त्यांचे एका पदावर काम करायचे राहून गेले ते म्हणजे मुख्यमंत्रिपद. त्यांच्यापासून हे पद हिरावून घेण्याचे काम मात्र मी केले, असे ते गंमतीत म्हणाले. मी शेवटपर्यंत लोकांशी संवाद साधत राहणार आहे. राष्ट्रपतिपद हा माझा मार्ग नाही असे सांगत, भावी राष्ट्रपती या चर्चेला शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.
शिंदेंइतकी उडी जमणार नाही; पवारांची कोपरखळी
एखादा नेता राष्ट्रपती झाला तर त्यानंतर तो निवृत्त होत असतो. त्यामुळे आपल्याला त्या रस्त्याला जायचेच नाही, असे शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तसेच, एखादा नेता राज्यपाल आणि राष्ट्रपती झाल्यानंतर निवृत्त होत असतो. पण सुशीलकुमार शिंदे त्याला अपवाद ठरले. राज्यपाल झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्रीही झाले होते. त्यामुळे त्यांच्या इतकी उडी मला जमणार नाही. म्हणून त्या रस्त्याला जायलाच मी तयार नाही, असे सांगून पवारांनी सुशीलकुमार शिंदेंना कोपरखळी लगावली.