शरद पवार मोदींच्या भेटीला!

0

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. महाराष्ट्रातील शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. सत्ताधारी पक्षाने तेही केंद्र आणि राज्य अशा दोन्हींमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने एका राज्यात कर्जमाफीचा निर्णय घेतल्यावर इतर राज्यात मागणी होणे साहजिक आहे, असे शरद पवार मोदींना म्हणाले. तसेच महाराष्ट्रातले शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन नसल्याचेही पवारांनी यावेळी नमूद केले.

केंद्राचे हात वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे म्हणणे ऐकून घेतले, पण केंद्राने याबाबतीत पुन्हा हात वर केले आहेत. हा निर्णय राज्यांनीच करायचा ही भूमिका कायम असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात बॉल टोलवल्याचे चित्र आहे.

पवार मोदींना नेमकं काय म्हणाले?
देशभरात दरवर्षी 12 हजार आत्महत्या होतात अशी सरकारची सर्वोच्च न्यायालयातील आकडेवारी सांगते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांत ही आकडेवारी सगळ्यात जास्त आहे. या तीन राज्यांमध्ये कर्जमाफीची गरज जास्त आहे. म्हणून तुम्ही हा प्रश्‍न गांभीर्याने घ्या, असे शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले आहे. तसेच ज्या मागण्यांसाठी विरोधात असताना तुम्ही आंदोलन करत होता, त्याच मागण्यांसाठी शेतकरी उद्वेग करत रस्त्यावर आला, तर त्यासाठी पोलीस बळ वापरण्याची काय गरज? हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, असेही शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तीन वर्षे झाली तरी, विद्यार्थी अभ्यासच करतोय, असा खोचक टोला शरद पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांना टोला
आता शेतकर्‍यांबद्दल कळवळा दाखवणार्‍या शरद पवार यांना 15 वर्षात हमीभाव का देता आला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना कदाचित माहिती नसेल की मुळात स्वामीनाथन आयोगाची नियुक्तीच मी केली होती. पदवीधर मतदारसंघातून येत असल्याने माध्यमिक शिक्षणांचे प्रश्‍न सोडवण्यातच त्यांचा वेळ गेला असावा. त्यामुळे त्यांना शेती, शेतकरी या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसावा. याचपार्श्‍वभूमिवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीमुळे आता महाराष्ट्रातील शेतकरी संपाची धग दिल्लीत पोहोचली आहे.