मुंबई । राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांची त्यांच्या नावाला सहमती असली तरी आपण मात्र या शर्यतीत नाही, असे पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरले पाहिजे. त्यांनी राष्ट्रपती व्हावे. नाही म्हणू नका, असा आग्रह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात धरला. मात्र, त्यावेळी पवार यांनी नकार देत आपण राष्ट्रपतीपदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर भाषण करताना प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले की, शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी चर्चेसाठी आहे. त्यांनी राष्ट्रपती झाले पाहिजे, नाही म्हणू नका. मात्र, व्यासपीठावर बसलेल्या शरद पवार यांनी त्याचवेळी नकारार्थी हात हलवत आपण राष्ट्रपतीपदासाठी इच्छूक नसल्याचे दाखवून दिले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. या बैठकीनंतर विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी शरद पवार यांची मनधरणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. विरोधी पक्ष केवळ सरकारकडून उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, हा उमेदवार सहमतीचा नसेल तर विरोधकांच्या आघाडीकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पुढे केले जाईल. सरकारने राष्ट्रपती म्हणून सर्वसहमतीने उमेदवार निवडावा एवढीच आमची अपेक्षा आहे. मात्र, तसे न घडल्यास विरोधी पक्षांकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. राष्ट्रीय राजकारणातला पवारांचा जनसंपर्क पाहता एनडीएतील अनेक घटकपक्षांचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो. 1991 मध्ये पंतप्रधानपद थोडक्यात हुकल्याचा कटू अनुभव गाठीशी असल्यामुळे तुर्तास तरी पवार यासाठी उत्सुक नाहीत. मात्र, एनडीएतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेची मते आपल्या बाजूने वळवण्याची ताकद फक्त पवारांकडेच आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली होती